वरळीच्या कामगार रुग्णालयालाही आगीचा धोका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

अंधेरीतील कामगार रुग्णालयाला लागलेल्या आगीची घटना ताजी असतानाच आता वरळीतील कामगार रुग्णालयालाही आगीचा धोका असल्याचे समोर आले आहे. या रुग्णालयात अग्निप्रतिबंधक यंत्रणा आहे, मात्र ही यंत्रणा चालवायची कशी याचे प्रशिक्षणच येथील कर्मचाऱयांना देण्यात आले नसल्याचे या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनीच सांगितले आहे. त्यामुळे भविष्यात येथे आग लागल्यास मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षी कमला मिलमध्ये घडलेल्या भीषण अग्नितांडवानंतर मुंबईतल्या अनेक मोठय़ा आस्थापनांच्या इमारती तसेच रुग्णालये, हॉटेल्स आणि गगनचुंबी इमारतींमधील अग्निप्रतिबंधक यंत्रणांचा प्रश्न ऐरणीवर आला होता. अनेक इमारतींमध्ये अग्निप्रतिबंधक यंत्रणाच नसल्याचे समोर आले होते अशा इमारतींवर कारवाईही करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर लगेचच वरळीच्या कामगार रुग्णालयात तातडीने अग्निप्रतिबंधक यंत्रणा बसविण्यात आली. घाईघाईने ही यंत्रणा बसविण्यात आली खरी, परंतु आता दीड वर्ष उलटूनही येथील कर्मचाऱयांना अग्निप्रतिबंधक यंत्रणा चालवायची कशी याचे प्रशिक्षणच देण्यात आलेले नसल्याचे समोर आले आहे.

आग लागल्यास इमारत कोसळण्याची भीती
वरळीच्या कामगार रुग्णालयाची तीन मजली इमारत 1960 रोजी उभारण्यात आली. त्यानंतर अग्निप्रतिबंधक यंत्रणेकडे फारसे गांभीर्याने पाहिले गेले नाही. ही यंत्रणा कुचकामी झाल्यानंतरही ती वेळोवेळी बदलण्यात आली नव्हती. कमला मिल दुर्घटनेनंतर नवीन सिलिंडर्स बसविण्यात आले, परंतु इमारत धोकादायक बनली असून तिचे नूतनीकरण करण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत या ठिकाणी आगीची घटना घडल्यास ही इमारत कोसळण्याची भीती असल्याचे येथील कर्मचाऱयांनी सांगितले. रुग्णालयाच्या नूतनीकरणासाठी 2016 पासून वारंवार सरकारकडे पाठपुरावा केला, परंतु अद्याप सरकारकडून कुठल्याही प्रकारचा निधी उपलब्ध करून देण्यात आलेला नसल्याचे आमदार सुनील शिंदे यांनी सांगितले. इमारतीचे नूतनीकरण केल्यास इमारतीची वयोमर्यादा 12 वर्षांहून अधिक वाढेल. परंतु नूतनीकरण केले नाही तर तीन ते चार वर्षांतच ती अधिक धोकादायक बनले असेही शिंदे म्हणाले.

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रस्तावाकडे दुर्लक्ष
वरळीच्या कामगार रुग्णालयाच्या नूतनीकरणासाठी तसेच अद्ययावत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून महाराष्ट्र प्रशासनाशी वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला. याबाबतचा प्रस्ताव पाठवला, परंतु सरकारने याची दखल घेतलेली नसून 2016 पासून चालढकल सुरू असल्याचे वरळीच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील उपविभागीय अभियंता अनिल कानेटकर यांनी सांगितले.

आयसीयू आणि ट्रॉमा सेंटरही नाही
इमारतीत सोयीसुविधाही नाहीत. वरळीसारख्या विभागात गंभीर आजारावर या रुग्णालयात अत्याधुनिक उपकरणे आणि यंत्रसामुग्रीही उपलब्ध नाही, पॅथलॅब नाही, खिडक्यांच्या काचा फुटलेल्या आहेत, स्लॅब कोसळत आहेत, शौचालयांमध्ये घाणीचे साम्राज्य आहे, एकच रुग्णवाहिका कार्यरत आहे. एक्स-रे काढण्यासाठी रुग्णांना केईएम, नायर, जे. जे. रुग्णालयात पाठवले जाते, बेडस्ची अवस्था बिकट आहे, अपघात विभागात योग्य प्रथमोपचार मिळत नाहीत, अशी माहिती सुनील शिंदे यांनी दिली. नुकतेच ऑपरेशन थिएटर सुरू करण्यात आलेले आहे, परंतु येथे अद्ययावत यंत्रसामुग्री नसल्याचे त्यांनी सांगितले.

गर्दुल्ल्यांचा रुग्णालय परिसरात धुडगूस
रात्री-अपरात्री रुग्णालयाच्या परिसरात गर्दुल्ल्यांचा धुडगूस सुरू असतो. अमली पदार्थ घेतलेले अनेक तरुण-तरुणी या परिसरात अक्षरशः हैदोस घालतात. अशा लोकांचा बंदोबस्त करण्यासाठी युवासेनाकडून सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. या ठिकाणी पोलिसांची गस्त वाढवण्यात यावी यासाठी असे निवेदन वरळी विधानसभेचे युवासेना उपविभागीय अधिकारी अभिजित पाटील यांनी वरळी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुखलाल वर्पे यांना दिले.