
वरळी हिट अॅण्ड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहिर शहाला पैशाची मस्ती आहे. पैशाच्या जोरावर तो स्वतःला कायद्याच्या वर समजतो, असे खडे बोल सुनावत सत्र न्यायालयाने नुकताच शहाचा जामीन फेटाळला.
एक वर्षाहून अधिक काळ कारागृहात आहे म्हणून शहाला जामीन दिल्यास जनमानसात चुकीचा संदेश जाईल. मुळात शहाचे वर्तन हे निर्दयीच होते, असेही अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. एस. एस. आरधे यांनी नमूद केले. मिहिरचे वडील राजेश शहा हे मिंधे गटाचे पदाधिकारी होते. हा अपघात झाल्यानंतर त्यांना पदमुक्त करण्यात आले होते. गेल्या वर्षी 7 जुलैला हा अपघात झाला. कावेरी नाखवा यांचा या अपघातात मृत्यू झाला. घटनेनंतर शहा फरार होता. तीन दिवसांनंतर त्याला अटक झाली. वर्षभरापासून कारागृहात आहे. या प्रकरणात आरोपपत्र दाखल झाले आहे. त्यामुळे जामीन मंजूर करावा, अशी मागणी शहाने केली होती, ती न्यायालयाने मान्य केली नाही.
पळून जाण्याची शक्यता
जामीन दिल्यास शहा साक्षीदारांवर दबाव टाकू शकतो. आमिष दाखवू शकतो. तो पळूनही जाऊ शकतो, असा दावा करत पोलिसांनी शहाच्या जामिनाला विरोध केला.