
मुंबईतील पर्यटनाला चालना देण्यासाठी वरळी दुग्धालयाच्या 14 एकर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय व कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यात येणार आहे. या योजनेसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात एक हजार कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. राज्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि मुंबईत बँकॉक येथील ओशन वर्ल्डच्या धर्तीवर जागतिक दर्जाचे भव्य असे मल्टिलेव्हल ऍक्वेरिअम (मत्स्यालय) उभारण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या होत्या. अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद केल्यामुळे जागतिक दर्जाचे मत्स्यालय उभारण्याच्या दृटीने एक पाऊल पुढे पडले आहे.
राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात मत्स्यालयासाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मध्यंतरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्रालयात बैठक आयोजित केली होती. देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्याच्या दृष्टीने मुंबईमध्ये बँकॉकच्या सिऍम ओशन वर्ल्डच्या धर्तीवर जागतिक दर्जाचे भव्य असे मल्टिलेव्हल ऍक्वेरियम (मत्स्यालय) उभे करण्याबाबत प्रस्ताव सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले होते. ऍक्वेरियमसाठी जागा निश्चित करण्याबरोबरच त्यासाठीचा आवश्यक प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही यावेळी त्यांनी दिल्या होत्या.
पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचा पुढाकार
राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनीही पर्यटनाला चालना देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. मुंबई शहराचे आंतरराष्ट्रीय महत्त्व लक्षात घेता शहरातील पर्यटनस्थळे त्याच दर्जाची करण्याचे पर्यटन विभागाची योजना आहे. शहरातील 22 प्रमुख पर्यटनस्थळांचे प्राधान्याने जतन, संवर्धन आणि विकास केला जाईल. बॉलीवूड संग्रहालय, क्रिकेट संग्रहालय आदींचीही निर्मिती करण्याची योजना आहे. गेट वे ऑफ इंडियाच्या संवर्धन आणि परिसर विकासाची योजना असून त्याचा आराखडा तयार करण्याच्या सूचना आदित्य ठाकरे यांनी दिल्या होत्या. त्याचाच एक भाग म्हणून पर्यटनाला चालना देण्यासाठी अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद केली आहे. यातून वरळीत आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर व जागतिक दर्जाचे मत्स्यालय उभारण्यात येईल असे मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांनी सांगितले. त्यासाठी निधीची तरतूद करण्याची मागणी आपण राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत केली होती. आता आर्थिक तरतूद केल्यामुळे मुंबईच्या पर्यटनात भर पडून पर्यटन व्यवसायाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.



























































