कुस्तीपटू बजरंग पुनियाच्या सरावाला महिनाभर मुदतवाढ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

या वर्षी होणाऱया टोकियो ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानचा कुस्तीपटू बजरंग पुनिया कसून सराव करतोय. त्याच्या अमेरिकेतील सरावाला आणखी महिनाभरासाठी मंजुरी मिळाली आहे, अशी माहिती हिंदुस्थान क्रीडा प्राधिकरणाने (साई) मंगळवारी दिली.

बजरंग पुनिया फ्री स्टाइल कुस्ती प्रकारात 65 किलो गटात ऑलिम्पिकमध्ये सर्वस्व पणाला लावणार आहे. अमेरिकेतील मिशीगन येथील क्लिफ कीन कुस्ती क्लबमध्ये 4 डिसेंबरपासून तो सराव करतोय. आता सरावाला महिनाभर मुदतवाढ मंजूर झाल्याने पुनिया फेब्रुवारीच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत तिकडेच सराव करणार आहे. त्याच्या महिनाभराच्या अतिरिक्त सरावाचा खर्च 11.65 लाख रुपये इतका येणार आहे. अमेरिकेत जिमची व्यवस्था चांगल्या प्रकारे असून सरावासाठी तुल्यबळ स्पर्धक आहेत. हिंदुस्थानात मला 74 आणि 79 किलो गटातील कुस्तीपटूंसोबत सराव करावा लागतो. अमेरिकेत माझ्याच गटातील कुस्तीपटू सरावासाठी असल्याने ऑलिम्पिकच्या पार्श्वभूमीवर योग्य दिशेने सराव सुरू आहे, असे बजरंग पूनियाने सांगितले.