
टोकियो ऑलिम्पिकआधी हिंदुस्थानला मोठा धक्का बसला आहे. ऑलिम्पिक कोटा मिळवणारा सुमीत मलिक डोप टेस्टमध्ये फेल झाला आहे. सुमीत मलिकवर बंदी घातलेल्या पदार्थांचे सेवन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. युनायटेड वर्ल्ड रेसलिंगकडून त्याला निलंबित करण्यात आले आहे. कुस्ती फेडरेशन ऑफ इंडियाकडून ही माहिती देण्यात आली आहे. आता सुमीत मलिकच्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करण्याच्या आशा धुसर झाल्या आहेत.
सलग दुसऱयांदा असे घडले
ऑलिम्पिकआधी डोप टेस्टमध्ये फेल होणारा सुमीत मलिक हा हिंदुस्थानचा सलग दुसरा कुस्तीपटू ठरला आहे. याआधी 2016 साली पार पडलेल्या रिओ ऑलिम्पिकआधी नरसिंग यादवही डोप टेस्टमध्ये फेल झाला होता. त्यानंतर त्याच्यावर चार वर्षांच्या बंदीची शिक्षा ठोठावण्यात आली होती. सुमीत मलिकने 125 किलो वजनी गटात हिंदुस्थानसाठी कोटा मिळवला होता.
10 जूनला आणखी एक टेस्ट
सुमीत मलिकला आणखी एका टेस्टला सामोरे जावे लागणार आहे. ही टेस्ट 10 जूनला होणार आहे. सध्या त्याला तात्पुरते निलंबित केले आहे. पण या टेस्टमध्येही तो दोषी सापडल्यास सुमीत मलिकला बंदीच्या शिक्षेला सामोरे जावे लागू शकते. दरम्यान, सुमीत मलिक या वेळी म्हणाला की, गेल्या काही महिन्यांत मला दुखापत झाली होती. यासाठी मी औषध घेत होतो. मी जाणूनबुजून बंदी असलेले औषध सेवन केलेले नाही, असेही त्याने सांगितले.
आठ खेळाडूंनी मिळवलाय ऑलिम्पिक कोटा
टोकियो ऑलिम्पिकसाठी हिंदुस्थानच्या आठ कुस्तीपटूंनी कोटा मिळवलाय. याआधी 2016 झालेल्या रिओ ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानच्या सात कुस्तीपटूंनी प्रवेश केला होता. सुमीत मलिकसह रवीकुमार दहिया, बजरंग पुनिया, दीपक पुनिया, सीमा बिस्ला, विनेश पह्गाट, अंशू मलिक व सोनम मलिक हे हिंदुस्थानी खेळाडू ऑलिम्पिकसाठी पात्र ठरले आहेत.


























































