मालिका निर्माते शिवशाहीचा चुकीचा इतिहास दाखवताहेत, विश्वास पाटलांची खंत

सामना प्रतिनिधी । पाथर्डी

इतिहासाचा कोणताही अभ्यास नसलेले मालिका निर्माते महाराष्ट्राच्या शिवशाहीचा चुकीचा इतिहास लोकांना दाखवत दिशाभूल करत असल्याने खरा इतिहास लोकांना समजणे दुरापास्त झाल्याची खंत पानिपतकार विश्वास पाटील यांनी व्यक्त केली. पाथर्डी बर्ड संस्थेच्या 10 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी आमदार मोनिका राजळे, जळगावचे जिल्हाधीकारी डॉ. अविनाश ढाकणे, जी.प. सदस्या प्रभावती ढाकणे, बर्डच्या अध्यक्षा ज्योती ढाकणे, नगराध्यक्ष डॉ. मृत्युन्जय गर्जे आदी उपस्थित होते.

विश्वास पाटील म्हणाले, मी पाचवीला असताना मला पानिपत हा धडा होता. या विषयावर शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नाला मला उत्तर देता आले नव्हते मात्र याच विषयावर अभ्यास करून मी पानिपत ही कादंबरी लिहिली. विद्यार्थ्यांनी सनदी अधिकारी होण्याची स्वप्ने पाहण्यापेक्षा आपल्या आवडीच्या क्षेत्रात करियर करावे. प्रत्येक क्षेत्रात एक शिखर असते ते सर करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करा अन कळसूबाईच्या शिखरापेक्षाही मोठी उंची गाठा. पालकांनीही आपल्या पाल्यांवर अपेक्षांचे ओझे लादु नये. इंग्रजी भाषा ही ‘वाघिणीचे दूध’ असले तरीही मराठी भाषा ही ‘नागिणीचे विष’ आहे. दोन्हीही भाषेचा समन्वय साधत आपली वाटचाल करा. मी सत्तर टक्के जग पाहिलेले आहे मात्र ‘सारे जहाँ से अच्छा हिंदोस्ता हमारा’, असा आपला देश आहे. छत्रपती शिवराय, संत ज्ञानोबा, तुकाराम हे फक्त आपल्याच देशात जन्माला आलेले आहे. मराठी भाषेत जे सौंन्दर्य आहे ते जगातील कोणत्याही भाषेत नाही. मराठी भाषेतच परीक्षा देऊन भूषण गागरानी हे सनदी अधिकारी झाले. देशाचे माजी अर्थमंत्री सी. डी. देशमुख हे शालेय जीवनातील प्रत्येक परीक्षेत पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण व्हायचे. परीक्षेचा निकाल लागला असे त्यांना कोणी सांगितले तर दुसरा कोण आला अशी विचारणा ते करायचे. प्रत्येकाने आपले आई, वडील व शिक्षकांशी निष्ठा राखावी. महाराष्ट्राचा इतिहास हा तलवारीने नव्हे तर धारातीर्थ पडलेल्या व त्याग केलेल्या स्रियांच्या अश्रूंनी लिहिलेला असून प्रत्येकाने छत्रपती शिवरायांसारखे जगावे तर संभाजीराजा सारखे धैर्याने मृत्यूला सामोरे जायला हवे असे आव्हान या वेळी त्यांनी केले.

आपली प्रतिक्रिया द्या