सुप्रिया सुळेंविरोधात आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्याला कार्यकर्त्यांनी घरी जाऊन चोपले

सामना ऑनलाईन । पुणे

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि अध्यक्ष शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्याविरोधात फेसबुकवर आक्षेपार्ह कमेंट करणे तरुणाला महागात पडले आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तरुणाला घरी जाऊन चोप दिला. अक्षय तांबवेकर असे या तरुणाचे नाव आहे.

एका वृत्तवाहिनीच्या फेसबुकवर सुप्रिया सुळे यांची ईव्हीएमबाबतची भूमिका दर्शवणारी बातमी पोस्ट करण्यात आली होती. या पोस्टखाली तरुणाने सुप्रिया सुळे यांच्याविषयी आक्षेपार्ह कमेंट केली. यानंतर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तरुण कार्यकर्ते तरुणाच्या घरी गेले आणि त्याला मारहाण केली. तसेच त्याला माफी मागण्यास सांगितले.

लेखी माफी
तरुण कार्यकर्त्यांनी तरुणाकडून लेखी स्वरुपात माफी लिहून घेतली. सोशल मीडियावर केलेल्या चुकीच्या पोस्टबाबत मी माफी मागत आहे. यापुढे कोणत्याही महिलेविषयी अपशब्द वापरणार नाही. मी माझे अकाऊंट डिलीट केले आहे, याबाबत जी कारवाई होईल त्याला मी जबाबदार असे असे लेखी पत्र तरुणाकडून लिहून घेण्यात आले.

सिंहगड पोलीस स्थानकात तक्रार दाखल
दरम्यान, सोशल मीडियावर सुप्रिया सुळे यांच्याविरोधात पोस्ट टाकणाऱ्या तरुणाविरोधात सिंहगड पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत.