चुकीच्या वीज बिलांचा महावितरण ग्राहकांना फटका; बिलाची दुरुस्तीही होत नसल्याने ग्राहक त्रस्त

1790

एकीकडे परळीत नेहमीच चुकीचे बिल दिले जात असल्याने महावितरणच्या ग्राहकांना मनःस्ताप सहन करावा लागत आहे तर दुसरीकडे परळी उपविभागात वीज बिलाच्या थकबाकीचा आकडा वाढत आहे. आता तर 1 लाखाहून अधिक थकबाकी असलेल्या ग्राहकांची संख्या 50 पेक्षा जास्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एक दोन नाही तर तब्बल 3500 ग्राहकांनी वाढीव वीजबिलाची दुरुस्ती करावी अशी मागणी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे,मात्र याबाबत महावितरण कडून दुर्लक्ष होत असल्याने वीज ग्राहकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

परळी उपविभागात परळी शहर 1 व 2, ग्रामीण 1 व 2 ,सिरसाळा व धर्मापुरी अशा चार मंडळात वीज वितरण करण्यात येते प्रत्येक मंडळात थकबाकीचा आकडा वाढुन आता परळी उपविभागात वीज ग्राहकांकडे 25 कोटींची थकबाकी झालेली आहे. ही थकबाकी वाढण्यास विजवितरणचे अधिकारी मोठ्या प्रमाणात कारणीभुत आहेत.साडेतीन हजार नागरिकांना त्यांनी केलेल्या वापरापेक्षा अधिक वीज बिल येत आहे. हे वाढीव वीज बिल दुरुस्त करुन देण्यासंदर्भात ग्राहकांनी दाखल केलेल्या तक्रारींचे निरसन करण्याऐवजी चालु बिल भरा थकबाकीचे पुन्हा बघु असे उडवाउडवीचे उत्तर दिले जात आहेत.

मागच्या 2 वर्षापासून यातील अनेक ग्राहकांचे विज बिल दुरुस्तीच केलेली नाही. ग्राहक कार्यालयात चकरा मारुन मेटाकुटीला आले आहेत. त्यातच अधिकारी कार्यालयात सतत गैरहजरच असल्याने ग्राहकांची यात कोंडी होत आहे. काहींना थकबाकी भरण्याची इच्छा असुनही दुरुस्ती अभावी ते भरता येत नाही. ऑक्टोबर 2019 मध्ये 300 ते 400 ग्राहकांना चुकीची वीज बिल देण्यात आले आहेत. कुठलीच पूर्वसूचना न देता अशा ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडीत केला जात आहे. शहरात अनेक ठिकाणासह परळी ग्रामीण भागात आकडे टाकून वीजचोरी करणाऱ्यावर महावितरण कुठलीच कारवाई करत नसल्याने नियमीत वीजबील भरणाऱ्या ग्राहकावर हा भार पडल्याचे बोलले जात आहे.

चुकीच्या घेतल्या जाणाऱ्या मीटर रीडिंग मुख्य कारण

 वीज मिटरची रिडींग नोंद करण्याचे काम योग्य पद्धतीने होत नसल्याने ही बिलाची समस्या उभी टाकली आहे.  बऱ्याच ठिकाणी रिडींग न घेताच बिलाचे आकडे टाकले जातात.यामुळे येणाऱ्या चुकीच्या बीलाने ग्राहक चांगलाच भरडला जात आहे.असे असतानाही ग्राहकांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करत चुकीचे बील देऊन ग्राहकांना वेठीस धरले जत आहे.याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी ग्राहकांकडून होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या