परतीच्या पावसामुळे पालेभाज्यांची आवक घटली गृहिणींचे बजेट कोलमडले

287

अतिरिक्त झालेला पाऊस आणि परतीच्या पावसामुळे जिह्यातील भाजीपाला उत्पादन करणाऱया क्षेत्राचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक पालेभाज्या आणि फळभाज्यांचे नुकसान झाल्याने बाजारात आवक कमी झाली आहे. परिणामी भाजीपाल्यांचे दर वाढल्याने सर्वसामान्य गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले आहे.

धुळे शहर आणि जिह्याचे सरासरी पर्जन्यमान 546 मिलिमीटर आहे. असे असताना यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाला. शिवाय गेल्या तीन आठवडय़ांपासून शहरासह जिह्यात परतीचा पाऊस होत आहे. परतीच्या पावसामुळे ढगाळ वातावरण निर्माण झाले. त्यामुळे भाजीपाला आणि फळभाजी क्षेत्राचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. ढगाळ वातावरणामुळे किडीचा प्रादुर्भाव झाल्याने भाजीपाला क्षेत्राचे जास्त नुकसान झाले. तसेच अतिरिक्त पावसामुळे भाज्या शेतीतच कुजल्या. साहजिकच शहराच्या भाजी मंडईत भाजीपाल्याची आवक कमी झाली. मागणी जास्त आणि आवक कमी झाल्यामुळे भाजीपाल्यांचे दर मोठय़ा प्रमाणात महागले आहेत. भाजी मंडईत भाजी घेण्यासाठी आलेल्या मध्यमवर्गीय गृहिणी भाजीपाल्याचे दर वाढल्यानंतर मोठय़ा प्रमाणात नाराजी व्यक्त केली आहे. सरासरी प्रत्येक भाजीमागे गेल्या पंधरा दिवसांत किलोस 30 ते 35 रुपये जास्त मोजण्याची वेळ आली आहे. प्रत्येक भाजी जवळपास 40 ते 60 रुपये प्रति किलो झाली आहे.

पूर्वी वांगे 20 रुपये प्रति किलो होते. ते आता चाळीस रुपये प्रति किलो झाले आहेत. गिलके-दोडके 30 रुपये प्रति किलो होते ते आता पन्नास रुपये प्रति किलो झाले आहेत. कांद्याची पात 20 रुपये प्रति किलो होती, ती आता चाळीस रुपये प्रति किलो झाली आहे. काकडी सरासरी 50 रुपये प्रति किलो तर टोमॅटो आकारमानानुसार 30 ते 40 किलो झाले आहेत. वेलवर्गीय भाज्यांमध्ये वाल 50 ते 60 रुपये प्रति किलो तसेच फुलकोबी 50 ते 60 रुपये प्रति किलो तर पत्ताकोबी चाळीस रुपये किलोची 80 रुपये किलो झाली आहे. कोथिंबिरीचे दर 100 ते दीडशे रुपये प्रतिकिलो झाले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या