माजी कृषीमंत्र्यांचे युरियाबाबतचे आरोप धादांत खोटे – यशोमती ठाकूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माजी कृषीमंत्री डॉ.अनिल बोंडे यांनी युरिया संदर्भात राज्य शासनावर केलेले आरोप धादांत खोटे असल्याचे अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकुर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. केंद्र सरकारने युरियाचे खत दिले असताना त्याचे व्यवस्थित वाटप होत नसल्याचा आरोप बोंडे यांनी केला होता. प्रत्यक्षात त्यांनी केंद्राकडून माहिती घेतल्यानंतरच राज्य शासनावर आरोप करायला हवे होते, असे ठाकूर यांनी सांगितले.

केंद्र सरकार देशातील इतर राज्यात असलेली बिगर भाजपशासित सरकारे पाडण्याचा कसा प्रयत्न करत आहे, याची माहिती देण्यासाठी यशोमती ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी गोवा, कर्नाटक, मध्य प्रदेश व राजस्थानमधील राजकारणाचा उल्लेख करत सत्तेसाठी भाजप कोणत्याही थराला जात असल्याचे सांगितले. देशात कोरोनाची महामारी असताना इतर राज्यातील सत्ता कशी बळकायची यासाठी भाजप प्रयत्न करीत असल्याचा आरोप ठाकूर यांनी केला. सरकार पाडण्यासाठी एवढा पैसा येतो कुठून असा सवाल करत भाजपने पैशांचा हिशोब द्यावा,अशी मागणी त्यांनी केली.

केंद्राने राज्य सरकारला युरिया पाठविला. मात्र, तो शेतकर्‍यांपर्यंत पोहचत नाही, असा आरोप माजी मंत्री डॉ.अनिल बोंडे यांनी केला होता. यावर बोंडे यांनी अभ्यास करुनच बोलायला हवे, असे त्या म्हणाल्या. अमरावती जिल्ह्याला 45 हजार टन युरियाची गरज आहे, असे असताना केवळ 33 हजार टन युरिया मंजूर केला. प्रत्यक्षात 17 हजार टनच युरिया जिल्ह्याला मिळाला आहे. युरिया पाठविण्याची जबाबदारीही केंद्र सरकारची आहे. असे असताना केंद्राने युरिया कमी का पाठविला, याचा जाब डॉ.बोंडे यांनी केंद्राला विचारला असता तर अधिक बरे झाले असते, असेही ठाकूर म्हणाल्या. मात्र, खोटे बोल पण रेटून बोल, ही पद्धतच भाजप नेत्यांनी अवलंबिली आहे. त्यामुळे वाटेल तसे खोटे बोलून राज्य सरकारला केवळ बदनाम करण्याचा भाजप नेत्यांचा प्रयत्न असल्याचा आरोप ठाकूर यांनी केला.

कापूस, सोयाबीन, तूर व चण्याची राज्य शासनाने मोठ्या प्रमाणात खरेदी करुन 500 कोटी रुपये सरकारी तिजोरीतून शेतकर्‍यांना दिले आहे. ही समाधानाची बाब असताना राज्य सरकारच्या बदनामीसाठी असे आरोप केसे जात असल्याचा आरोप ज्येष्ठ काँग्रेस नेते व माजी आमदार विरेंद्र जगताप यांनी केला आहे. पत्रकार परिषदेला अमरावतीचे आमदार सुलभा खोडके, बँकेच्या अध्यक्षा उत्तरा जगताप, बँकेचे संचालक प्रकाश काळबांडे यांच्यासह काँग्रेसचे अनेक नेते उपस्थित होते.