
सामना प्रतिनिधी । नागपूर
यवतमाळ येथे होणाऱया 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांच्या हस्ते होणार असून या तीन दिवसीय संमेलनात परिसंवाद, कविसंमेलन, टॉक शो असा भरगच्च कार्यक्रम आखण्यात आला आहे.
यवतमाळ शहरातील पोस्टल ग्राऊंडवर 11 ते 13 जानेवारी दरम्यान ही सारस्वतांची जत्रा भरणार आहे. संमेलनाध्यक्ष डॉ. अरुणा ढेरे असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह लक्ष्मीकांत देशमुख, डॉ. श्रीपाद जोशी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. संपूर्ण संमेलन परिसराला ‘राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य नगरी’ असे नाव देण्यात आले असून मुख्य मंडपाला ‘शायर भाऊसाहेब पाटणकर परिसर’ असे नाव देण्यात आले आहे. 11 जानेवारीला सकाळी ग्रंथ दिंडी होणार असून उद्घाटनानंतर सायंकाळी कविसंमेलन होणार आहे. तीन दिवस सतत चालणाऱया कवीकट्टय़ाचे उद्घाटन संमेलनाध्यक्षांच्या हस्ते होणार असून शनिवार 12 जानेवारीत ग.दि. माडगूळकर यांच्या साहित्य संपदेचा वेध घेणारा सांगीतिक कार्यक्रम सादर होईल. ज्येष्ठ कवयित्री व समीक्षक डॉ. प्रभा गणोरकर यांची मुलाखत होणार असून ‘माध्यमांची स्वायत्तता ः नेमकी कोणाची?’ या विषयावर टॉक शो आणि वऱहाडी बोली कविसंमेलन होणार आहे.


























































