रेती माफियांचा संपूर्ण जिल्ह्यात धडगूस ,चक्क तहसील कार्यालयातून रेती जप्तीतील ट्रक गेला चोरीला

>> प्रसाद नायगावकर.

अवैध रेतीची वाहतूक करताना महसूल विभागाने यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील महादापेठ येथे साडेचार महिन्यापूर्वी जप्त केला होता . हा ट्रक तहसील कार्यालयाच्या पटांगणात उभा होता . आता हाच ट्रक चोरीला गेल्याने महसूल यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उभे केले जात आहे . कदाचित कुंपणच शेत खात नाही ना अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.

6 फेब्रुवारी रोजी रेतीची अवैध वाहतूक करताना महसूल विभागाचे पथकाला ट्रक महादापेठ गावाजवळ आढळून आला.त्यामुळे चौकशी अंती हा ट्रक जप्त करून याचा अहवाल वरिष्ठांना पाठविण्यात आला. गेल्या साडेचार महिन्या पासून जप्तीतील इतर वाहनासह हा ट्रक तहसील कार्यालयाचे पटांगणात उभा होता. मात्र शासकीय सुट्टी असल्याने कार्यालाय बंद असताना हा ट्रक अज्ञात चोरट्यानी लंपास केला. ट्रक मध्ये भरून असलेली जप्तीची रेती तिथेच टाकून चोरटे खाली ट्रक घेऊन पळून गेले.

ही माहिती कळताच खळबळ निर्माण झाली आहे. या ठिकाणी जप्तीचे इतर दहा, बारा वाहने या ठिकाणी उभे असताना नेमका रेती भरून असलेला ट्रक चोरीला गेल्याने अनेक शंका कुशंका व्यक्त केल्या जात आहे. याबाबत तहसीलचे अव्वल कारकून दिनेश पांडे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करून चोरट्या चा शोध घेत आहे..

संपूर्ण जिल्ह्यात रेती माफियांचा हैदोस

काही दिवसांपूर्वी महागाव तालुक्यातील भोसा परिसरात पैनगंगा नदीपात्रात रस्त्याच्या कारणावरून वाळू तस्करांच्या दोन गटात अंदाधुंद गोळीबार झाल्याची घटना समोर आली होती .दिग्रस येथे रेती तस्करांनी तलाठी आणि कोतवाल यांना मारहाण केली होती . याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता . त्यामुळे प्रशासनाची चांगलीच नाचक्की झाली होती . अशा एक ना अनेक घटना जिल्ह्यात समोर आल्या आहेत .

जिल्ह्यात सर्वत्र रेती माफिया हैदोस घालत आहेत . दुसरीकडे मात्र विविध योजनांतील घरकुलांचे काम मोठ्या प्रमाणावर सुरु आहे . प्रति ब्रास 8 हजार ते 10 हजार रुपयेप्रमाणे लाभार्थी रेती विकत घेऊ शकत नाही . यामुळे आपल्या घराचे स्वप्न कसे पूर्ण होणार या विवंचनेत लाभार्थी आहेत .

शासन आणि उच्च न्यायालयाने घालून दिलेल्या निर्देशाची पायमल्ली करून येथे रेतीच्या व्यवसाय अव्याहतपणे सुरू आहे. स्थानिक तहसील दुर्लक्ष करत असल्याच्या अनेक तक्रारी जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आलेल्या आहेत. महसूल प्रशासन या घटनेवर मात्र चुप्पी साधून बसले आहे. तालुक्यातील कायदा आणि सुव्यवस्था स्थानिक पोलिस प्रशासनाच्या व महसूल प्रशासनाच्या हाताबाहेर गेल्यामुळे जनतेमधून संताप व्यक्त केला जात आहे. राजकीय नेतृत्व कमी पडत असल्याने जनतेमध्ये सत्ताधाऱ्याविरुद्ध नाराजी पसरली आहे.. कुठेतरी या सर्व बाबींना निर्बंध बसावा अशी आशा सर्वसामान्य नागरिक करीत आहेत .