
सामना प्रतिनिधी । बंगळुरू
कर्नाटकात कमळ फुलले असून, भाजपचे सरकार आले आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा यांनी आज मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल वजूभाई वाला यांनी त्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. दरम्यान, 29 जुलैला ते बहुमत सिद्ध करणार आहेत.
एस. डी. कुमारस्वामी यांचे काँग्रेस- जेडीएस सरकार बहुमताअभावी तीन दिवसांपूर्वी कोसळल्यानंतर कर्नाटकात भाजपचा सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला होता. प्रदेशाध्यक्ष बी. एस. येडियुरप्पा हे मुख्यमंत्री होणार हेही स्पष्ट होते, मात्र कुमारस्वामी सरकार कोसळल्यानंतर तत्काळ सरकार स्थापनेचा दावा येडियुरप्पा यांनी केला नाही. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा केल्यानंतर आज राज्यपाल वजूभाई वाला यांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा येडियुरप्पा यांनी केला नाही. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाशी चर्चा केल्यानंतर त्यांनी आज राज्यपाल वजूभाई वाला यांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला. येडियुरप्पा यांनी काडू मल्लेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतले.
मंत्र्यांच्या समावेशाबाबत लवकरच निर्णय
राजभवनावर झालेल्या छोटेखानी सोहळ्यात येडियुरप्पा यांचाच शपथविधी झाला. राज्यपाल वजूभाई वाला यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. दरम्यान, मंत्रिमंडळात कोणाचा समावेश करायचा याचा निर्णय भाजप अध्यक्ष, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करून लवकरच घेतला जाईल असे येडियुरप्पा यांनी सांगितले.
काठावर बहुमत
कर्नाटक विधानसभेचे संख्याबळ 225 आहे. एक अपक्ष आणि दोन काँग्रेसच्या आमदारांना सभापती रमेश कुमार यांनी अपात्र ठरविले आहे. मात्र, आणखी 14 बंडखोर आमदारांवर निर्णय झालेले नाही. येडियुरप्पा बहुमत सिद्ध करतील तेव्हा हे 14 बंडखोर विधानसभेत उपस्थितीत राहण्याची शक्यता कमी आहे. त्यावेळी सभागृहात उपस्थितीत सदस्यांची संख्या 208 असेल. बहुमताचा जादुई आकडे 105 वर येईल. भाजपकडे 105 आमदार आहेत. त्यामुळे येडियुरप्पा विश्वासदर्शक ठराव जिंकतील हे निश्चित मानले जाते.
चौथ्यांदा मुख्यमंत्री
- 76 वर्षांचे येडियुरप्पा हे कर्नाटकाचे 25 वे मुख्यमंत्री आहेत. ते चौथ्यांदा मुख्यमंत्री बनले आहेत.
- पहिल्यांदा 12 नोव्हेंबर 2007 ते 19 नोव्हेंबर 2007 असे केवळ आठ दिवस ते मुख्यमंत्री होते.
- 17 मे 2008 ला ते दुसर्यांदा मुख्यमंत्री बनले. 31 जुलै 2011 पर्यंत ते पदावर होते.
- तिसर्यांदा 17 ते 19 मे 2018 असे अवघे तीन दिवस ते मुख्यमंत्रीपदावर होते.
- आता चौथ्यांदा त्यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे.




























































