
सामना प्रतिनिधी । पुणे
पुणे महापालिकाहद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या येवलेवाडी गावच्या विकास आराखड्यावर (डीपी) नियोजन समितीने केलेल्या सर्व शिफारशी सर्वसाधारण सभेत बहुमताच्या जोरावर फेटाळून भाजपने माघार घेतली. शहर सुधारणामार्फत सर्वसाधारण सभेने यापूर्वी मान्य केलेल्या येवलेवाडीच्या ‘डीपी’वर आज अंतिम शिक्कामोर्तब केले. त्यामुळे 40 एकर क्षेत्राचे केलेले निवासीकरण रद्द होऊन पुन्हा आरक्षणे कायम राहिली आहेत. त्यात विशेषकरून डोंगरमाथा-डोंगरउताराचे (हिलटॉप-हिलस्लोप) 15 हेक्टर क्षेत्र आणि दफनभूमीचे पाच एकरचे केलेले निवासीकरण रद्द झाले आहे.
महापालिकेच्या हद्दीत येवलेवाडी गावाचा समावेश झाला. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या गावांचा स्वतंत्र प्रारूप विकास आराखडा तयार केला. शहर सुधारणामार्फत या डीपीला सर्वसाधारण सभेची मंजुरी घेण्यात आली. या डीपीवर हरकती आणि सूचनांची सुनावणी घेण्यासाठी नियोजन समितीची नियुक्ती करण्यात आली. त्यात स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक, नियोजन समिती सदस्य सुनील कांबळे, रंजना टिळेकर, भ. वि. कोलटकर, अशोक गुळवे, शेखर डी. चव्हाण यांचा समावेश होता. या डीपीवर नागरिकांच्या एकूण एक हजार 203 हरकती आणि सूचना आल्या होत्या. त्यावर चार दिवस सुनावणी घेण्यात आली. त्यानंतर या नियोजन समितीने हा अहवाल सादर केला होता. या अहवालाच्या शिफारशीसह सर्वसाधारण सभेपुढे हा डीपी अंतिम मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. सर्वसाधारण सभेत डीपीचा विषय पुकारताच उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी उपसूचना वाचण्यास सुरुवात केली. त्यावर आम्हाला या विषयाची माहिती द्या अशी मागणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी केली. मात्र, ही मागणी फेटाळत उपसूचना वाचण्यात आली. त्यावर शिवसेनेच्या संगीता ठोसर, शिवसेनेचे विशाल धनवडे, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, राष्ट्रवादीचे विशाल तांबे, काँग्रेसच्या सुजाता शेटी, शिवसेनेचे गटनेते संजय भोसले, शिवसेनेचे अविनाश साळवे यांनी उपसूचना मांडल्या.
त्यात विविध आरक्षण बदलण्यास विरोध करण्यात आला होता. एकूण आठ उपसूचना मांडण्यात आल्या होत्या. त्यापैकी सत्ताधारी भाजपची उपसूचना वगळता उर्वरित सर्व उपसूचना बहुमताच्या जोरावर 49 विरुद्ध 89 मतदानाने फेटाळण्यात आल्या. सत्ताधारी भाजपने मांडलेली उपसूचना ही प्रस्तावाच्या परस्पर विरोधी असल्यामुळे त्यावरही मतदान घेण्यात आली. त्यानंतर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी सत्ताधारी भाजप आणि विकास आराखड्यावर टीकेची झोड उठविण्यात आली. त्याला भाजपच्या नगरसेवकांनी प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला.
शिफारशीचा अहवाल फेटाळल्यामुळे काय होणार
डोंगरमाथा डोंगर उताराच्या (हिल टॉप, हिल स्लोप) 15 हेक्टर क्षेत्राचे केलेले निवासीकरण रद्द झाले. सर्व्हे नंबर २९ मधील दफनभूमीचे आरक्षण बदलून ते निवासी करण्याची शिफारस या समितीने केली होती. हे आरक्षण शहर पातळीवरील नसून, ते स्थानिक पातळीवरील आहे.
येवलेवाडीपेक्षा कोंढवा क्षेत्रामध्ये मुस्लिम लोकसंख्या जास्त आहे. येवलेवाडी सव्र्हे नंबर 32 मध्ये पालिकेच्या मालकीचे क्षेत्र आहे. खासगी खडकाळ जागा संपादनापेक्षा पालिकेच्या मालकीच्या क्षेत्रात किंवा कोंढव्यालगत आरक्षण प्रस्तावित करणे योग्य होणार आहे. हे आरक्षण सर्व्हे नंबर 32च्या उत्तरेकडील कोंढवा हद्दीतील पूर्व-पश्चिम विकासयोजना रस्त्यांच्या दक्षिणेस नकाशात दर्शविल्यानुसार प्रस्तावित करण्यात येणार आहेत. एखाद्या समाजासाठी जागेचे आरक्षण ठेवण्याची तरतूद नाही, असे त्या अहवालात म्हटले होते, पण हा अहवालाच फेटाळण्यात आल्यामुळे दफनभूमीचे आरक्षण बदलून ते पाच एकरचे निवासी करण्याचा प्रयत्न असफल झाला आहे. सव्र्हे नंबर 13 मधील वॉटर स्पोर्ट्सचे आरक्षण कायम राहिले आहे.
अशा मिळणार सुविधा
विकास आराखड्यामुळे येवलेवाडीमध्ये मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, प्रसूतिगृह, दवाखाना, शैक्षणिक आरक्षणे, मनोरंजनात्मक आरक्षणे – उदा. क्रीडांगण, उद्याने, जलक्रीडा, बहुउद्देशीय मैदान इ., आरोग्य सेवक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरबांधणी, पीएमपीएमएल डेपो, जनावरांसाठीचा दवाखाना, कचरा प्रक्रिया प्रकल्प, पाणीपुरवठा, वृद्धाश्रम, पोलीस चौकी, पोलीस ठाणे, पोस्ट कार्यालय, टेलिफोन एक्स्चेंज, नाला गार्डन, वाहनतळ, रस्त्यांचे सक्षम जाळे आदी सुविधा निर्माण होणार आहेत.
दहा वर्षांत अंमलबजावणी
येवलेवाडीच्या विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी 577.03 कोटी निव्वळ खर्च येणार आहे. त्यासाठी प्रतिवर्षी 57.7 कोटी महापालिकेच्या वार्षिक अंदाजपत्रकातून तरतूद करण्यात येणार असून, पुढील दहा वर्षांत आराखड्याची अंमलबजावणी करण्यात येईल.






























































