
पुण्यातील येरवडा कारागृहात वेगवेगळ्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेल्या तीन कैद्यांचा मृत्यू झाला आहे. कैद्यांचे मृत्यू वेगवेगळ्या आजारपणातुन झाला असल्याचे कारागृह प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रकरणी येरवडा कारागृहात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
संदेश अनिल गोंडेकर (वय 26, रा. डोणजे, हवेली), शाहरूख बाबू शेख (वय 29, रा. कोंढवा), रंगनाथ चंद्रशेखर दाताळ (वय 32, रा. मोरगाव, बारामती) अशी मृत्यू झालेल्या कैद्यांची नावे आहेत. गोंडेकर याला 2018 मध्ये खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती, तेव्हापासून त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली होती. त्याचे आई-वडील त्याला भेटण्यासाठी नियमितपणे जात होते.
31 डिसेंबर रोजी त्याचे वडील त्यास भेटण्यासाठी कारागृहात गेले होते. त्यावेळी त्यांना हवेली पोलीस ठाण्यामार्फत त्यांच्या मुलाचा मृत्यू झाल्याची माहिती समजली. त्यानंतर त्यांनी मुलाच्या मृत्युप्रकरणास कारागृह प्रशासन जबाबदार असल्याचे सांगत आक्षेप नोंदविला होता. मात्र त्याचा मृत्यू ‘लिव्हर सोरायसिस’मुळे झाल्याचे कारागृह प्रशासनाने सांगितले.
दरम्यान, शाहरुख शेख व रंगनाथ दाताळ या कैद्यांना विविध प्रकारच्या आजारांनी ग्रासले होते. त्यातुनच त्यांचा मृत्यू झाला आहे. त्याबाबत येरवडा कारागृह प्रशासनाच्या वतीने संबंधितांच्या कुटुंबीयांना कळविले आहे. दरम्यान, येरवडा मध्यवर्ती कारागृहात शनिवारी संदेश गोंडेकर, शाहरूख शेख व रंगनाथ दाताळ या तीन कैद्यांचा मृत्यु झाला आहे. तिन्ही कैद्यांना विविध प्रकारचे आजार होते, त्यामध्ये त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय पथकाने स्पष्ट केले आहे, अशी माहिती येरवडा ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम यांनी दिली आहे.



























































