
पुण्यासह राज्यभरात प्रसिद्ध असलेल्या येवले चहासाठी लागणारे प्रीमिक्स पावडर व चहा मसाला बनविणाऱ्या कोंढवास्थित कंपनीवर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) छापा टाकला. यावेळी विविध त्रुटी आढळून आल्या असून, अन्न सुरक्षा व मानके कायद्याचा भंग केल्याप्रकरणी कंपनीला पुढील आदेश येईपर्यंत तत्काळ उत्पादन थांबविण्याचे आदेश दिले. यानंतर ‘येवले चहा’चे मालक नवनाथ येवले यांनी एका फेसबुक पोस्टद्वारे आपल्या सर्व शाखा सुरू राहतील आणि उत्पादन थांबले नसून विरोधकांनी अफवा पसरवल्या असल्याचे म्हटले आहे.
‘येवले अमृततुल्य’कडून मेलामाईन नावाचा पदार्थ वापरण्याचे कोणतेही कृत्य झालेली नाही. फक्त कच्च्या मालाच्या पॅकेटवर कंटेंट स्टिकर लावलेले नाही. पॅकिंगसदर्भात त्रुटी आढळल्याने त्याची पूर्तता करण्याचे एफडीएने सांगितले. आम्ही तात्काळ याची पूर्तता केली आहे. प्रसारमाध्यांत आलेल्या बातम्यांमधील मजकुराप्रमाणे मेलामाईन नावाचा पदार्थ यात आढळून आलेला नाही. त्यामुळे आपले कोणत्याही प्रकारचे उत्पादन थांबलेले नाही किंवा थांबणारही नाही, असे नवनाथ येवले यांनी स्पष्ट केले आहे. येवले अमृततुल्य ग्राहकांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी कटीबद्ध आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
त्यांनी आपल्या पोस्टमध्ये पुढे म्हटले की, खोट्या किंवा आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करताना विचार उचलण्याची गरज आहे. काही लोक कुठल्या एका व्यवसायाबद्दल किंवा व्यावसायिकाबद्दल खोट्या अफवा पसरतील अशा पोस्ट टाकून त्या व्हायरल करत आहे. याचा परिणाम व्यावसायिकासह त्याच्या कामगार वर्गावरही होतो. कुठलीही पोस्ट, माहिती अथवा फोटो व्हायरल झालेला असल्यास त्याची खात्री असल्या शिवाय व्हायरल न करणे हा योग्य उपाय आहे. आपले चुकीचे पाऊल काहींच्या आयुष्यावर परिणाम करू शकते. विरोधकांनी खोट्या अफवा पसरवणे बंद करावे, असे आवाहनही नवनाथ येवले यांनी केले आहे.






























































