ओबीसी नाही, ओवैसी; वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रामदेव बाबांचे घुमजाव

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

योगगुरू रामदेव बाबा यांच्या एका विधानामुळे मोठी खळबळ उडाली होती. ओबीसी समाजाबाबत केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे त्यांनी नवा वाद ओढवून घेतला होता. एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी स्वत:ला ब्राह्मण म्हणत ओबीसी समाजाविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याचा व्हि़डीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. नेटकऱ्यांनी त्यांना ट्रोल करत पतंजलीच्या उत्पादने बॉयकॉट करण्याचे आवाहन केले. मात्र त्यानंतर ओबीसी नव्हे ओवैसी अशी सावरासावर करत रामदेव बाबांनी आपल्या आधीच्या वक्तव्यावरुन घुमजाव केले आहे.

रामदेव बाबा वाद वाढल्यानंतर म्हणाले, माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ घेण्यात आला, मी तर ओबीसी बोललोच नव्हतो, मी ओवैसी बोललो होतो. मात्र सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओत रामदेव बाबा सांगत आहेत की, स्वत:ला ब्राम्हण म्हणत ओबीसी समाजाविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करताना दिसत आहेत.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर स्पष्टीकरण देताना रामदेव म्हणाले की, मी असे कोणतेही वक्तव्य केलेले नाही. पत्रकाराला ओबीसींबाबत केलेल्या वक्तव्याची आठवण करून देताना रामदेव म्हणतात, “ओवैसी…ओवैसी उलट्या डोक्याचे आहेत, त्याचे काय? ओवैसींचे पूर्वज नेहमीच देशद्रोही विचारांचे राहिले. आम्ही ते गांभीर्याने घेत नाही. हे ओबीसींबाबत नव्हते. ओबीसींबद्दल आम्ही कधीही नकारात्मक बोललो नाही.

उल्लेखनीय म्हणजे रामदेव यांच्या ओबीसींच्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली होती. सोशल मीडियावर अनेकांनी पतंजलीच्या उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले होते.