रामलल्लाचा पगार योगी सरकारने वाढवला

290

अयोध्येतील वादग्रस्त भूमीवर बसवण्यात आलेल्या रामलल्ला मंदिराच्या पूजाअर्चा, भोग या सगळ्यासाठी आतापर्यंत 26 हजार 200 एवढे रुपये महिन्याकाठी दिले जात होते. रामलल्लाच्या या पगारात उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने वाढ करून आता 30 हजार रुपये दिले जाणार आहेत. म्हणजेच देशातील सर्वसामान्यांच्या पगारात भले वाढ झाली नाही तरी अयोध्येच्या रामलल्लाच्या पगारात तब्बल 3 हजार 800 रुपयांची भरघोस वाढ झाली आहे.

अयोध्येचे कमिशनर मनोज मिश्र यांनी याबाबतची माहिती दिली. त्याशिवाय प्रधान पुजाऱयांना आता महिन्याला 13 हजार रुपये पगार दिला जाणार आहे. एवढेच नाही तर मंदिरातील इतर 8 सदस्यांचे पगारही 500 रुपयांनी वाढवण्यात आले आहेत. या कर्मचाऱयांचे पगार 7500 ते 10 हजार या दरम्यान आहेत. प्रसादावर आता महिन्याकाठी 800 रुपये जादा खर्च केले जाणार आहेत. प्रधान पुजारी सत्येंद्र दास यांनी सांगितले की, खर्च खूप होतोय, पण या छोटय़ा पगारवाढीने आम्ही आनंदी आहोत. याच वर्षी जुलैमध्ये आम्ही सरकारला पगारवाढीबाबत निवेदन सादर केले होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

न्यायमूर्ती गैरहजर; सुनावणी झालीच नाही

श्रीरामभूमी प्रकरणावरून सोमवारी सर्वेच्च न्यायालयात सुनावणी होऊ शकली नाही. मुख्य न्यायमूर्ती रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील चार न्यायमूर्तींच्या खंडपीठातील न्यायमूर्ती शरद बोबडे गैरहजर राहिल्यामुळे सोमवारी सुनावणी झालीच नाही. सुनावणीला सुरुवात होण्यापूर्वीच न्यायालयीन कर्मचाऱयांनी दोन्ही बाजूंच्या वकिलांना बोबडे उपस्थित राहणार नसल्याची माहिती दिली. सोमवारी आठव्या दिवशी रामलल्ला विराजमान या पक्षकाराच्या वतीने युक्तिवाद केला जाणार होता.

आपली प्रतिक्रिया द्या