तू काही चुकीचं करत नाहीयेस ना? दिवसाला तीन ते चार तास काम, वर्षाला 40 लाख कमावणाऱ्या मुलाच्या पालकांना AI जाॅबमुळे पडला प्रश्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सध्या आपण एका अशा जगात वावरतोय जिथे AI चा वापर प्रत्येक क्षेत्रात फार मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. तरीही अजूनही काही जणांना या नवीन बदलाबद्दल माहीती नसल्याकारणाने अधिक चिंता वाटू लागते. अशीच एक घटना घडलीय दिल्लीमध्ये. दिल्लीस्थित उद्योजक रोहन धवन हा एक २४ वर्षांचा डेव्हलपर आहे. रोहनची वार्षिक कमाई ही ४० लाख असून, तो दिवसाला केवळ तीन ते चार तासच काम करतो.

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) क्षेत्रातील नोकऱ्यांमुळे कामाच्या पद्धतीत मोठा बदल होत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. एका 24 वर्षीय तरुणाच्या कमाईमुळे त्याचेच आई-वडील चिंतेत पडल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, हा तरुण एका AI-आधारित कंपनीत रिमोट पद्धतीने काम करतो. त्याचे वार्षिक उत्पन्न सुमारे ₹40 लाख इतके आहे. विशेष म्हणजे, तो दिवसाला केवळ 3 ते 4 तास काम करतो.

मुलगा कमी वेळ काम करूनही मोठी कमाई करत असल्याने त्याच्या पालकांना संशय आला आहे. “तो काही बेकायदेशीर काम तर करत नाही ना?” अशी चिंता त्यांनी व्यक्त केली आहे. पारंपरिक विचारसरणीनुसार जास्त वेळ काम केल्यासच जास्त उत्पन्न मिळते, अशी त्यांची धारणा आहे. तज्ज्ञांच्या मते, AI आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे अनेक कामे कमी वेळेत पूर्ण होऊ शकतात. त्यामुळे कामाचे तास कमी झाले असले तरी उत्पादकता वाढली आहे. विशेष कौशल्य असलेल्या तरुणांना कमी वेळात अधिक उत्पन्न मिळवणे शक्य होत आहे.

ही घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली असून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी पालकांची चिंता योग्य असल्याचे म्हटले, तर अनेकांनी बदलत्या काळानुसार कामाच्या नव्या पद्धती स्वीकारण्याची गरज व्यक्त केली.