
झेंड्याचा विद्यूत तारेला स्पर्श झाल्याने साई पालखीतील तरुणाचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना कोपरगाव तालुक्यातील टाकळी शिवारात रात्री साडे दहा वाजता घडली. अमोल भवगान कोंढरे असे शॉक लागून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, निफाड तालुक्यातील वाकद शिरवाडे गावातून 30 जणांची ही साई पालखी शिर्डीकडे निघाली होती. कोपरगाव तालुक्यातील टाकळी शिवारात रात्री साडे दहा वाजता ही पालखी पोहोचली. जेवण झाल्यानंतर ही पालखी 11 वाजता शिर्डीकडे निघाल्यानंतर अमोल भगवान कोंढरे वय (20) याने आपल्या हातातील झेंडा वरती केला. या झेंड्याने वरील विद्युत वाहक तारेला स्पर्श केल्याने अमोलचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर ग्रामस्थांसाह पालखीतील इतर साईभक्तांनी अमोल याला कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात आणले मात्र त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता.पोलिसांनी पंचनामा केला असून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, अमोल हा एनसीसी कॅडेट होता. हिंदुस्थानी सैन्य दलात भरती व्हायची त्याची इच्छा होती.

























































