
सामना प्रतिनिधी। राहुरी
राहुरी तालुक्यातील वळण मांजरी येथे व्हॉट्सअॅपवर चॅट करत असताना तरुणांमध्ये वाद झाला. या वादाचे रुपांतर तरुणाच्या निघृण हत्येत झाल्याची धक्कादायक घटना घ़डली आहे. मंगेश आण्णासाहेब खिलारी (२२ ) असे या तरुणाचे नाव आहे. हल्लेखोरांनी हल्ल्याआधी मंगेशच्या डोळ्यात मिरची पूड टाकली. त्यानंतर त्याच्यावर चाकू, गुप्ती सारख्या धारदार शस्राने तब्बल २२ वार केले व त्याची निर्घुण हत्या केली. ही घटना रविवारी रात्री घ़ली आहे.
गावातील मुलांचा व्हॉट्सअॅप ग्रुप होता. मंगेशही त्या ग्रुपमध्ये अॅड होता. काही दिवसांपूर्वी चॅटींगदरम्यान मंगेश व इतर मुलांमध्ये वाद झाला. त्यानंतर मंगेशने ग्रुपमध्ये बोलणे सोडून दिले. यामुळे इतरांनी त्यांच्यात मध्यस्थी करत वाद मिटवण्यास सांगितले. यामुळे मंगेशही झाले गेले विसरून पु्न्हा ग्रुपमध्ये बोलू लागला. पण मंगेशचा ज्या मुलांबरोबर वाद झाला होता त्यांना मंगेशचा सूड उगवायचा होता. यामुळे सगळ्यांसमोर त्यांनी वाद मिटल्याचे दाखवले व ते पुन्हा मंगेशबरोबर चॅट करू लागले. रविवारी मंगेश हरिकीर्तनला जातो सांगून घराबाहेर पडला. पण परतलाच नाही. यामुळे घरातल्यांनी त्याची शोधाशोध सुरू केली. अखेर घरातल्यांनी पोलीस स्टेशनमध्ये मंगेश बेपत्ता असल्याची तक्रार केली. त्यानंतर मांजरी रस्त्यावरील शेताजवळ मंगेशचा मृतदेह पोलिसांना सापडला. त्यानंतर तपासात मंगेशचा चारजणांशी वाद झाल्याचे पोलिसांना कळाले. नंतर सोमवारी पहाटे वळण येथून चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच याप्रकरणातील दोघेजण फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.
मारेकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मंगेश किर्तन ऐकण्यासाठी जात असताना त्याला व्हॉट्सअॅप ग्रुपमधील त्या मित्रांनी अडवले. त्याला धमकावत त्यांनी शेताजवळ वळण मांजरी येथे नेले. यास विरोध करणाऱ्या मंगेशच्या डोळ्यात मारेकऱ्यांनी मिरची पूड फेकली .यामुळे मंगेशला काहीच दिसत नव्हते. त्याचदरम्यान इतरांनी चाकू व गुप्तीने मंगेशच्या पोट, छाती, चेहरा व डोक्यावर तब्बल २२ वार केले. यात मंगेशचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर मारेकऱ्यांनी तिथून पळ काढला. शेतकरी कुटूंबातील खिलारी यांचा मंगेश हा एकुलता एक मुलगा होता. या घटनेने वळण पंचक्रोशीतील ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.





























































