यंग इंडिया, फिट इंडिया! गेट वे ऑफ इंडिया येथे छत्रपती पुरस्कार सोहळा संपन्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
yung-india-fit-india

सामना प्रतिनिधी । मुंबई

महाराष्ट्रातील मानाचा समजला जाणारा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सोहळा रविवारी मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे पार पडला. या वेळी राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी महाराष्ट्रातील युवकांना ‘स्मार्टफोन सोडा व मैदानाकडे या’ असे आवाहन करतानाच ‘यंग इंडिया, फिट इंडिया’ असा संदेश दिला. याप्रसंगी मल्लखांब गुरू उदय देशपांडे यांना जीवनगौरव तर गिर्यारोहक प्रियांका मोहिते हिला साहसी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्रातील तब्बल 88 व्यक्तींना शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराने गौरवण्यात आले. या वेळी राज्याचे क्रीडा मंत्री विनोद तावडे, प्रदीघ गंधे, जय कवळी, राजेंद्र पवार, नरेंद्र सोपाल या मान्यवरांची उपस्थिती होती. धारावी क्रीडा संकुलातील युवकांनी जिम्नॅस्टीक्सची प्रात्यक्षिके दाखवत प्रेक्षकांची मने जिंकली.

खेळ जीवनाचा अविभाज्य घटक बनायला हवा

शाळा तसेच कॉलेजमध्ये वर्षाला एक दिवस क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. मात्र वर्षाला फक्त एक दिवस क्रीडा दिन म्हणून साजरा करून आपण क्रीडा राष्ट्र बनू शकत नाही. खेळ आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक असायला हवा, असे सी विद्यासागर राव यांना वाटते.

विद्यार्थ्यांनी दिवसाला एक तास खेळायला हवे

भारतरत्न सचिन तेंडुलकर याने ‘यंग ऍण्ड फिट इंडिया’ संकल्पना माझ्यासमोर व्यक्त केली. तो म्हणाला, प्रत्येक विद्यार्थ्याने दिवसाला किमान एक तास खेळायला हवे. त्याची ही संकल्पना मला आवडली. शालेय विद्यार्थ्याने किमान एक तास खेळाच्या मैदानावर असायला हवे. पालक व शिक्षकांनीही हे समजून घ्यायला हवे, असे सी विद्यासागर राव म्हणाले.

संभाजीनगरमध्ये पहिले विकसित क्रीडा विद्यापीठ स्थापन करणार

महाराष्ट्रासह हिंदुस्थानला क्रीडा क्षेत्रात उत्तुंग उंचीवर नेण्यासाठी विकसित क्रीडा विद्यापीठाची नितांत गरज आहे. क्रीडा क्षेत्राला रोजगारभिमुख बनवण्यासाठी संभाजीनगर येथे अशा प्रकारचे विद्यापीठ स्थापन करणार असल्याचे राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी या वेळी सांगितले.

मल्लखांबपटूंची उदय देशपांडेंना मानवंदना

या वेळी श्री समर्थ व्यायाम मंदिराच्या मल्लखांबपटूंनी व्यासपीठावर मल्लखांबची प्रात्यक्षिके सादर करीत आपले ‘गुरू’ उदय देशपांडे यांना मानवंदना दिली.

पुण्याची सलोनी अन् मुंबईच्या महेशची शहीदांना अनोखी श्रद्धांजली

पुण्याची बुद्धिबळपटू सलोनी सापळे व मुंबईचा स्क्वॉशपटू महेश माणगावकर यांनी पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्यांना अनोखी श्रद्धांजली वाहिली. महाराष्ट्र सरकारकडून क्रीडा पुरस्कारासाठी त्यांना देण्यात आलेले एक लाख रुपयांचे बक्षीस दोघांनीही शहीदांच्या कुटुंबीयांना दिले. महेश माणगावकर हा परदेशात असल्यामुळे त्याच्या वडिलांनी पुरस्कार स्वीकारला.

विराट कोहलीच्या नेतृत्वात हिंदुस्थानने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात धूळ चारली. विराट कोहलीसारख्या सक्षम नेतृत्वाची हिंदुस्थानातील इतर खेळांना गरज आहे. त्यानंतर जागतिक क्रीडा क्षेत्रात आपण श्रेष्ठ बनू शकतो, असा विश्वास सी. विद्यासागर राव यांनी या वेळी व्यक्त केला.