
शिवज्योत आणण्यासाठी रांगणा किल्ल्यावर गेलेल्या सांगली जिह्यातील एका तरुणाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेची नोंद भुदरगड पोलिसांत दाखल करण्यात आली आहे. ओमकार भीमराव पाटील (वय 19, रा. शिराळा, जि. सांगली) असे या मृत तरुणाचे नाव आहे.
शनिवार दि. 19 फेब्रुवारी रोजी होत असलेल्या शिवजयंतीनिमित्त शिवज्योत आणण्यासाठी बुधवारी पणुब्रे वारुण येथील तरुण भुदरगड तालुक्यातील रांगणा किल्ल्यावर आले होते. किल्ल्यावरील तलावाची स्वच्छता करताना गुरुवारी ओमकार अचानक बुडून बेपत्ता झाला.
आपत्कालीन व्यवस्थापनाच्या पथकांकडून रात्री उशिरापर्यंत तलावात शोध सुरू होता. अखेर आज शुक्रवारी सकाळी अकराच्या सुमारास ओमकारचा मृतदेह आढळला. सोनवडे येथील महाविद्यालयात शिक्षण घेणारा ओमकार आईवडिलांचा एकुलता एक मुलगा असून, त्याने शेळीपालन प्रकल्प सुरू केला होता. वडील ग्रामपंचायत कर्मचारी आहेत.





























































