
शेअर बाजारात ऑनलाईन फसवणूक झाल्याने त्यातून आलेल्या नैराश्यातून 20 वर्षीय तरुणाने रेल्वे रुळावर उडी मारून आत्महत्या केली होती. या प्रकरणी कुर्ला रेल्वे पोलिसांनी तपास करून तीन महिन्यांनी फसवणूक आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
विजय ताटे (20) हा पवई येथे राहत होता व 12वी इयत्तेत शिकत होता. 17 जुलै रोजी त्याने घाटकोपर आणि विक्रोळी रेल्वे स्थानकांदरम्यान ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्याने कुठल्याही प्रकारची चिठ्ठी लिहिलेली नव्हती. त्यामुळे कुर्ला रेल्वे पोलीस ठाण्यात अपमृत्यूचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर पोलिसांनी तपास केला असता विजयने ऑनलाईन शेअर बाजारात पैसे गुंतवल्याचे समोर आले. सायबर भामट्यांनी विजयला शेअर बाजारात गुंतवणूक करण्यास भाग पाडले होते. या सापळ्यात तो अडकला आणि त्याने एक लाख 80 हजार रुपये गमावले होते. हे पैसे ज्या खात्यात गेले होते ते खातेधारक शोधल्यावर त्या चौघांविरोधात पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. पोलीस आता या गुह्यातील मुख्य आरोपींचा शोध घेत आहेत.