
मित्राची दुचाकी गायब केल्याच्या वादातून सात जणांनी सिडको परिसरातून एका 17 वर्षीय मित्राचे अपहरण केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी रात्री 10.30 वाजता एन-6 बजरंग चौकात घडली. या अपहरणाची माहिती मिळताच अवघ्या दोन तासात सिडको पोलिसांनी तरुणाची वाळूज परिसरातून सुटका करून तिघांना बेड्या ठोकल्या.
सिडको एन-6 येथील ग्रिव्हिज कॉलनीत राहणाऱ्या मनीषा समाधान गायकवाड यांचा मुलगा मयंक समाधान गायकवाड (वय 17) हा बारावीत शिकतो. शुक्रवारी रात्री 10.30 वाजता मयंकचा मित्र आर्यन अनिल नैनाव (रा. म्हसोबानगर) त्याला घरी बोलावण्यासाठी आला. ‘मित्रासोबत बाहेर जातो’, असे सांगून मयंक घराबाहेर पडला. दोघे आर्यनच्या चेतक स्कुटीवरून एन-6 भागातून बजरंग चौकाकडे जात असताना अचानक मागून आलेल्या दोघांनी मयंकचा शर्ट पकडून त्याला ओढण्यास सुरुवात केली. त्यामुळे तोल जाऊन दोघे खाली पडले. तेवढ्यात आणखी एक तरुण धावत आला. तिघांनी मिळून मयंकला फरफटत नेण्याचा प्रयत्न केला. याचवेळी दुचाकीवरून आलेल्या आणखी तिघांनी मयंकला जबरदस्तीने कारमध्ये कोंबले. कारमधील पाच आणि दुचाकीवरील दोघांसह सात जणांनी मयंकचे अपहरण केले होते. दरम्यान, हा घडलेला प्रकार मयंकचा मित्र आर्यन याने गायकवाड कुटुंबीयांना कळवल्यानंतर उघडकीस आला. मनीषा गायकवाड यांनी सिडको पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
या घटनेचे गांभीर्य ओळखून ओव पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज, वाहन क्रमांक आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांची पथके वाळूज परिसरात रवाना करून विवेक गणेश सोनवणे (19, रा. रांजणगाव शे.पुं), पांडुरंग माधवराव सोनवणे (21, रा. सुरेवाडी, जाधववाडी, मूळ रा. फुलंब्री) आणि रोहन सुनील ढवळे (19, रा. इंद्रप्रस्थ कॉलनी, बजाजनगर) या तिघांच्या मुसक्या आवळल्या. ही कारवाई निरीक्षक अतुल येरमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल नाणेकर, शेवाळे, मंगेश पवार, विशाल सोनवणे, अमोल अंभोरे, प्रदीप फरकाडे, देवा साबळे आदींनी केली. या आरोपींना शनिवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना 6 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
दुचाकीवरून झाला होता वाद
पोलिसांनी या प्रकरणी आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर आरोपींनी कॉलेजमधील मित्रांच्या एका ग्रुपमधील वादातून हे अपहरण घडल्याचे सांगितले. काही दिवसापूर्वी रोहन ढवळे याची दुचाकी मयंक याला दिली होती. त्याने ती दुचाकी यश नावाच्या मित्राला दिली. मात्र, यशने ती दुचाकी गायब केली. रोहनच्या वडिलांनी दुचाकी कोठे आहे, अशी वारंवार विचारणा करुन तगादा लावल्यानंतर दुचाकी मिळविण्यासाठी या मुलांनी अपहरणाचा कट रचल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली.
सिडको पोलिसांच्या सतर्कतेमुळे 2 तासांत सुटका
सिडको पोलीस ठाण्यात अपहरणाची45 तक्रार समोर येताच पोलीस निरीक्षक अतुल येरमे यांच्या पथकाने खबऱ्यामार्फत हे आरोपी वाळूज परिसरात फिरत असल्याची माहिती मिळविली. पोलिसांनी वाळूज परिसर गाठून अवघ्या दोन तासात मयंकची सुखरूप सुटका केली तसेच आरोपींपैकी तिघांना बेड्या ठोकल्या. उर्वरित आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

























































