खाडीत बुडणाऱ्या मुलीला वाचवणाऱ्या तरुणाचा बुडून मृत्यू, पंतनगरात हृदयद्रावक घटना

घाटकोपरच्या पंतनगर परिसरात एक हृदयद्रावक घटना घडली. खाडीत बुडत असलेल्या एका मुलीला वाचविण्यासाठी 28 वर्षांचा तरुण सरसावला. त्याने स्वतः खाडीत झोकून देत त्या मुलीला बाहेर काढण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. त्याच्या प्रयत्नाला यशही आले, पण दुर्दैवाने त्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला.

पंतनगर परिसरात राहणारी 9 वर्षांची मुलगी सोमवारी दुपारी घराबाहेर खेळत होती. ती खेळत असलेला चेंडू बाजूलाच असलेल्या जॉय मॅक्स शाळेच्या मागच्या बाजूकडील खाडीत गेला. तो चेंडू काढण्याचा प्रयत्न करत असताना ती खाडीत पडली. याची बोंबाबोंब झाल्यानंतर तेथेच राहणारा व मजुरी करणारा शेहजाद खान (28) याला याबाबत समजले. शेहजादने क्षणाचाही विलंब न लावता घराबाहेर पडून मुलीला वाचविण्यासाठी स्वतःला खाडीत झोकून दिले. त्याने प्रयत्नांची शर्थ करून मुलीला बाहेर काढले, पण खाडीत तोच अडकला आणि तेथून बाहेर पडता न आल्याने त्यातच बुडून शेहजादचा मृत्यू झाला. याबाबत पंतनगर पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद केली आहे.

परिसरात हळहळ

घरात बसलेला शेहजाद माणुसकीच्या दृष्टीने खाडीत बुडत असलेल्या मुलीला वाचविण्यासाठी सरसावला. त्याच्यामुळे ती मुलगी बचावली; पण मदतीला हात देणाऱ्या शेहजादवर काळाने घाला घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.