
कातवण येथे पेट्रोलपंपावर कामाला असलेला जानोजी गोपीनाथ गावकर (32, रा. मिठबांव डगरेवाडी) येथील तरुण 8 एप्रिल रोजी मुंबईला जातो, असे सांगून घरी न परतल्याने त्याची बहिण नमिता नितीन थळेश्री यांनी देवगड पोलीस स्थानकात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जानोजी गावकर हा कातवण सडा येथील पेट्रोलपंपावर कामाला होता. 8 एप्रिल रोजी सकाळी 6.30 वाजता आईला मुंबई येथे कामाकरिता जातो आणि सोमवारी येतो, असे सांगून घरातून गेला. त्यानंतर तो परत आला नाही म्हणून त्याला संपर्क करण्यासाठी फोन केला. तेव्हा त्याच्या फोनची रिंग झाली आणि फोन बंद झाला. त्यामुळे त्याच्याशी संपर्क होऊ शकला नाही.
यामुळे जानोजी याच्या मुंबईत राहणाऱ्या बहिणीकडे याबाबत चौकशी केली असता तो तिच्या घरी गेला नसल्याचे समजले. त्याचा सर्वत्र शोध घेऊनही तो कुठेच सापडला नाही. म्हणून बहिण नमिता थळेश्री यांनी देवगड पोलीस स्थानकात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. याबाबत अधिक तपास देवगड पोलीस करत आहेत.



























































