
वाढदिवसाला तलवारीने केक कापणाऱ्या पुण्यातील बर्थडे बॉयला जेलची हवा खावी लागली आहे. तलवारीने केक कापल्याचे फोटो सोशल मीडियावर अपलोड करणाऱ्या तरूणाला गुन्हे शाखेच्या पथक एकने अटक केली. अजिंक्य भगवान राजगुरू (वय 27, रा. येरवडा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याकडून केक कापण्यासाठी वापरलेली तलवार जप्त करण्यात आली आहे.
गुन्हे शाखा पथक एकचे अधिकारी आणि कर्मचारी हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी तरूणाने वाढदिवस साजरा करताना तलवारीने केक कापल्याची माहिती पोलीस अमंलदार इम्रान शेख आणि तुषार माळवदकर यांना मिळाली. त्यानुसार पथकाने अजिंक्य राजगुरू याला येरवडा परिसरातून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याविरूद्ध 2016 मध्ये कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यातंर्गत गुन्हा दाखल आहेत. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश संखे, पोलीस उपनिरीक्षक संजय गायकवाड, सुनील कुलकर्णी, सतीश भालेकर, अजय थोरात, इम्रान शेख, महेश बामगुडे, अय्याज दड्डीकर, तुषार माळवदकर यांनी केली.




























































