इन्स्टाग्रामवरील टॅग काढण्यास सांगितल्याने तरुणाला मारहाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । पिंपरी

मुलीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एका पोस्टमध्ये वर्गात शिकणाऱ्या मुलाला टॅग केले. मुलाला हे टॅग आवडले नसल्याने त्याने मुलीला फोन करून टॅग काढण्यास सांगितले. यावरून चिडलेल्या मुलीच्या पालकांनी मुलाच्या मोठ्या भावाला बेदम मारहाण केली. यामध्ये भाऊ जखमी झाला. ही घटना रविवारी (दि. १०) रात्री नऊच्या सुमारास चिखलीतील मोरेवस्ती येथे घडली.

मनीष महेंद्र भट्ट (वय २५, रा. साने कॉलनी, मोरेवस्ती, चिखली) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नायर, हेमंत सोनार, सुनील सोनार, ललित सोनार (सर्व रा. रामनगर, चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी यांचा भाऊ महेश भट्ट (वय १९) आणि आरोपीची मुलगी सोनिया नायर हे दोघेजण एकाच वर्गात शिकतात. सोनियाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट केली. ही पोस्ट तिने महेशला टॅग केली. महेशला हे आवडले नसल्याने त्याने सोनियाला फोन करून टॅग काढण्यास सांगितले. यावरून सोनियाच्या पालकांनी आणि अन्य तीनजणांनी मिळून महेश याचा भाऊ फिर्यादी मनीष याला मारहाण केली. फायटरने डोक्यात, डाव्या हाताला खांद्याजवळ मारल्याने मनीष यांना गंभीर दुखापत झाली. सहायक पोलीस निरीक्षक नीलेश जगदाळे तपास करत आहेत.