मराठा आरक्षणासाठी कोल्हापूर जिल्ह्यातला पहिला बळी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । कोल्हापूर

नोकरी नसल्याच्या नैराश्यातून करवीर येथे राहणार्‍या २५ वर्षीय विनायक गुदगी या युवकाने आज सकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. मराठा आरक्षण मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने गेल्या अकरा दिवसांपासून शांततेत सुरू असलेल्या आंदोलनावर त्याचा परिणाम झाला. मराठा समाजाच्या वतीने दसरा चौकात रास्ता रोको करुन सरकारचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सुद्धा रस्त्यावर ठाण मांडले. वातावरण तणावपूर्ण झाल्याने प्रचंड पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

दरम्यान शवविच्छेदनानंतर विनायक गुदगी यांचे पार्थिव ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी आणुन सामुदायिक श्रद्धांजली वाहण्यात आली. शहरात दिवसभर तणावपूर्ण वातावरण होते. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने सर्वत्र  आंदोलन सुरू आहे. कोल्हापूरातही ऐतिहासिक दसरा चौक येथे छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्या समोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू असुन, दिवसेंदिवस आंदोलनाला पाठिंबा वाढतच आहे. गांव बंद ठेवून पायी चालत तसेच दुचाकी रॅली ने पाठिंब्यासाठी आज सकाळ पासून गर्दी होऊ लागली होती. एकीकडे आंदोलन शांततेत सुरू असतानाच मराठा आरक्षणासाठी एका युवकाने आत्महत्या केल्याची वार्ता समजताच आंदोलन तणावपूर्ण बनले. याचवेळी दसरा चौक येथे आंदोलकांनी रास्तारोको आंदोलन करत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सह सरकार विरोधात तीव्र घोषणाबाजी सुरू केली. यावेळी ठिय्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी आलेले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सुद्धा या रस्त्यावर ठाण मांडून सरकारचा निषेध केला. भर पावसात हे आंदोलन सुरू होते. यानंतर पृथ्वीराज चव्हाण यांच्या कडुन विनायक गुदगी या तरुणास श्रद्धांजली वाहण्यात आली.

दरम्यान दुपारी शवविच्छेदनानंतर विनायक गुदगी याचा मृतदेह दसरा चौकात रुग्णवाहिकेतून दाखल होताच पुन्हा वातावरण भावनिक झाले. यावेळी उपस्थित आंदोलकांच्या वतीने सामुदायिक श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच ‘यापुढे कोणीही आत्महत्या करायची नाही, मरायचे नाही तर मारायचे असे आवाहन करुन, आतापर्यंत मराठा आरक्षणासाठी तेवीस आत्महत्या झाल्या, मुख्यमंत्र्यांना आता किती जणांचा बळी घ्यायचा आहे’ असा संताप व्यक्त करणारा सवालही आंदोलकांच्या वतीने उपस्थित करण्यात आला.