मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बीड मध्ये आणखी एका तरुणाची आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

सामना ऑनलाईन । बीड

मराठा आरक्षणाच्या मागणीवरून जिल्ह्यात आत्महत्येचे सत्र सुरूच आहे. शनिवारी दोघांनी आत्महत्या केल्यानंतर आज रविवारी एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील केसापूरी येथे घडली आहे. २२ वर्षीय मच्छिंद्र रामप्रसाद शिंदे असे तरुणाचे नाव असून त्याने घरातील आडूला गळफास घेऊन आत्महत्या केली. मराठा आरक्षणाच्या मागणीवरूनच त्याने आत्महत्या केली असल्याचे गावकाऱ्यांनी सांगितले आहे.

त्यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. घटनेनंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणला असता आर्थिक मदत आणि कुटूंबातील एका सदस्यास शासकीय सेवेत घेण्याची मागणी यावेळी गावकऱ्यांनी केली आहे. त्यानुसार उपविभागीय अधिकारी विकास माने यांनी प्रशासनाच्या वतीने १० लाखाची आर्थिक मदत आणि घरातील एकास शासकीय सेवेत घेण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर मृतदेह ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू असून रात्री उशिरा केसापूरी येथे मच्छिंद्र शिंदे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.