फिल्टरप्लॅन्टच्या शेडमध्ये विजप्रवाह उतरल्याने तरुणाचा मृत्यू

835

जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील मुरमा येथील अनिल माणिकराव मुकणे (36) या तरुणाचा शेतातील वॉटरफिल्टरच्या पत्र्याच्या शेडमध्ये विजप्रवाह उतरल्याने जागीच मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी 7 ते 9 वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

अनिल मुकणे यांचा गावाजवळच्या शेतात पाण्याचा फिल्टरप्लॅन्ट असून शेती करून फिल्टरप्लॅन्टचा व्यवसाय तो करतो. आठ दिवसांपूर्वी याच फिल्टरप्लॅन्टसाठी वीज जोडणी घेत असताना त्याला विजेचा जोरदार शॉक बसला होता. त्या शॉकमुळे त्याचे डोके दुखत असल्याने अधिक तपासणीसाठी त्याला जालना येथे जायचे होते. फिल्टरसाठी लागणारे दिवसभराचे पाणी भरण्यासाठी तो शेतात गेला होता. बराच उशीर झाला तरी वडील परत आले नसल्याने अनिलचा मुलगा शेतात गेला असता त्याला वडील खाली पडलेले दिसल्याने त्याने गावात सांगितले. गावकऱ्यांनी त्याला उपचारासाठी तीर्थपुरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. एकनाथ नवसगर यांनी त्याला मृत घोषित केले. शवविच्छेदन करून मुरमा येथे दुपारी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या