
गोरेगावमध्ये चोर समजून चौघांनी केलेल्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू झाला. हर्षल परमा असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी गोरेगाव पोलिसांनी चौघांना अटक केली. सलमान खान, इसमुल्ला खान, गौतम चमार आणि राजीव गुप्ता अशी त्या चौघांची नावे आहेत. हर्षल हा गोरेगावच्या मोतीलाल नगर येथे राहत होता. शनिवारी रात्री हर्षल हा दारू पिण्यासाठी बाहेर जात असल्याचे सांगून घरातून निघून गेला. गोरेगावच्या एका इमारतीत हर्षलला काही लोकांनी मारहाण केली. त्या मारहाणीत हर्षल हा जखमी झाला होता. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.