
दहावीच्या परीक्षेसाठी जाणाऱया विद्यार्थ्याचा कळव्याजवळ धावत्या लोकलमधून कोसळून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच डहाणूकडे जाणाऱया लोकलमधून दारात उभा असलेला तरुण वैतरणा नदीच्या खोल पात्रात कोसळल्याची घटना बुधवारी रात्री उशिरा घडली. किर्र अंधार, वेगवान प्रवाह आणि अथांग पाणी… साक्षात समोर मृत्यूच उभा… परंतु त्या तरुणाने पुलाच्या पिलरला घट्ट धरत मृत्युशी झुंज दिली आणि स्थानिक गावकरी होडी घेऊन मदतीला धावले. त्यामुळे त्याचा जीव बचावला. देव तारी त्याला कोण मारी याचा प्रत्यय उद्यान वांगड या बोईसरमधील तरुणाला आला.
बोईसरमध्ये राहणारा उद्यान वांगड हा तरुण रात्री डहाणू लोकलने घरी निघाला. तो लोकलच्या दारातच उभा होता. लोकल वैतरणा खाडीच्या पुलावरून वेगात जात असताना उद्यान वांगड याचा पाय फुटबोर्डवरून घरसला आणि तो थेट नदीपात्रात कोसळला. वैतरणेचा प्रचंड प्रवाह… किर्रर्र अंधार आणि अथांग पाणी यामुळे त्याचा थरकाप उडाला. मृत्यू साक्षात समोर दिसत होता. पण त्याने धीर सोडला नाही. प्रसंगावधान राखून त्याने पुलाच्या पिलरचा आधार घेतला. प्रवाहाशी झूंज देत तो तिथेच पिलरला घट्ट चिकटून उभा राहिला. हा प्रकार काही स्थानिक नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी बोट पाण्यात उतरवली आणि उद्यानपर्यंत पोहोचत त्यांनी त्याला सुरक्षित बाहेर काढले.
उपचार सुरू, प्रकृती स्थिर
ग्रामस्थांनी उद्यान वांगड याला तातडीने स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याच्यावर तातडीने उपचार करण्यात आले. त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.


























































