पिस्तुल घेऊन फिरणाऱ्या तरुणाला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, नांदेड

इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज पहाटे २ वाजता एक पिस्तुल घेऊन फिरणाऱ्या २८ वर्षीय संशयित आरोपीस पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून पिस्तुल आणि दोन काडतूसे पोलिसांनी जप्त केल्या आहेत. इतवारा पोलीस आपल्या हद्दीत रात्रीची गस्त घालत असतांना पहाटे दोन वाजता इतवारा ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक नंदकुमार सोळंके यांनी एमजी रोडवरून एकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून एक पिस्तुल आणि दोन जिवंत काडतूस जप्त केली.

सोहन रौत्रे (२८) रा. जुना मोंढा, नांदेड हा रात्री नशेत हातात पिस्तुल धरुन येणाऱ्या जाणाऱ्यांना फायर करण्याची धमकी देत होता. यावेळी फौजदार सोळंके यांनी त्याला शिताफीने पकडले. त्याच्या विरुद्ध इतवारा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रात्रीच्या गस्तीत गर्जे, स्वामी, जाधव आणि खाजा या कर्मचाऱ्यांचा सहभाग होता. पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे यांनी डीबी पथकाचे कौतुक केले.