
सामना प्रतिनिधी, मुंबई
शिवाजी पार्क चौपाटीवर गुरुवारी मध्यरात्री देवीच्या विसर्जन मिरवणुकीवेळी अनुचित प्रकार घडला. विसर्जन मिरवणुकीत दारूच्या नशेत तर्रर्र झालेले दोन मंडळांचे तरुण एकमेकांना भिडले. त्यात एका 19 वर्षीय तरुणाची हत्या झाली. शिवाजी पार्क पोलिसांनी दोघांना अटक केली असून तिसरा आरोपी फरार आहे.
मानखुर्द आणि धारावीच्या शाहूनगर येथील मंडळे देवीच्या विसर्जनासाठी मध्यरात्री दीडच्या सुमारास शिवाजी पार्क चौपाटीवर आली होती. तेव्हा दोन्ही मंडळांचे काही तरुण दारूच्या नशेत तर्रर्र होते. मानखुर्दचा जगदीश कदम (19) याचा शाहूनगरच्या अविनाश नलावडे, स्टॅनली पुजारी आणि समीर या तरुणांमध्ये धक्का लागल्याच्या कारणावरून वाद झाला. वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले आणि नशेत असलेल्या अविनाश, स्टॅनली आणि समीर यांनी जगदीशला मारहाण केली.
उपचारादरम्यान मृत्यू
एकाने जगदीशच्या गळय़ावर दारूच्या बाटलीने वार केले. त्यामुळे गंभीर जखमी झालेल्या जगदीशला तत्काळ रहेजा रुग्णालयात नेले. तेथून त्याला केईएम रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान जगदीशचा मृत्यू झाला. पोलिसांनी याप्रकरणी अविनाश आणि स्टॅनलीला अटक केली असून समीरचा शोध सुरू आहे.
summary- youth got killed in devi visarjan






















































