वसमतमध्ये तलवारीने हल्ला करून युवकाचा खून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, वसमत

जुन्या भांडणाच्या कारणावरुन वसमत शहरातील शिवा सौदा या युवकाचा तलवारीने सपासप वार करत खून केल्याची घटना 30 जून रोजी रात्री साडे नऊ वाजता घडली. याप्रकरणी सोमवार 1 जुलै रोजी 6 जणांविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे वसमत शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे.

वसमत शहराच्या बुधवारपेठ भागातील श्रीकांत बापुराव सांडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, भटीगल्ली भागातील प्रभाकर क्षीरसागर, रामा क्षीरसागर, भगत क्षीरसागर, सोनु क्षीरसागर, अमुल क्षीरसागर व भागवत जाधव या सहा जणांनी वसमत ते नांदेड रस्त्यावरील माळवटा पाटीवर असलेल्या कमलपुष्प बारच्या जवळ एकत्र येऊन शिवा सौदा याच्यावर तलवारीने हल्ला चढविला. भागवत जाधव याने शिवाच्या डोक्यात तलवारीचा घाव घालून जखमी केले. तर इतर पाच जणांनी छातीवर व अन्य ठिकाणी तलवारीने घाव घालून खून केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. वसमत ग्रामीण पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक बळीराम बंदखडके हे अधिक तपास करत आहेत. वसमतचे पोलीस उपअधीक्षक सतीश देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली. या प्रकरणातील आरोपींना अद्याप अटक झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.