लॉकडाऊनमध्ये शिवनेतील तरुण वळले शेतीकडे; आधुनिक पद्धतीने केली भाज्यांची लागवड

लॉकडाऊनच्या काळात अनेक रोजगार थंडावले आहेत. अनेक उद्योगधंदे बंद पडले आहेत. तसेच कोरोनाचा फैलाव टाळण्यासाठी अनेकजण घरीच थांबले आहेत. लॉकडाऊनमुळे तोचा होत असला तरी पर्यारणाला त्याचा फायदा झाला आहे. वायू, जल प्रदूषण कमी झाले आहेत. तसेच शेतीपासून दुरावलेले तरुण पुन्हा शेतीकडे वळल्याचे दृश्य दिसत आहे. संगमेश्वर नजिकच्या शिवने येथील तरुणांनी शेतीकडे वळत आधुनिक पध्दतीने विविध प्रकारच्या भाज्यांची लागवड केली आहे. अशाप्रकारे त्यांनी लॉकडाऊनमधील वेळेचा सदुपयोग केला आहे. शेतीत काम करताना सोशल डिस्टन्सिंग आणि इतर नियमांचेही पालन करण्यात आले.

कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊनची मुदत वाढवण्यात येत आहे. लॉकडाऊनमुळे आवक कमी असल्याने विविध भाज्यांचे दरही वाढले आहेत. संगमेश्वर तालुका भाज्यांसाठी पश्चिम महाराष्ट्रावर अवलंबून आहे. लॉकडाऊनमध्ये काही वेळा बाजारपेठेत भाजी येणेही अशक्य होते. अशावेळी आधुनिक पध्दतीने मोठ्या प्रमाणावर भाजीपाला लागवड केली, तर बाजारपेठेत मागणी पूर्ण करता येईल, या हेतूने शिवने येथील काही तरुणांनी पुढाकार घेतला. लॉकडाऊनमुळे महाविद्यालय बंद असल्याने ते एकत्र आले आणि त्यांनी भाजीपाला लागवड करण्याचे ठरवले. शिवने गावातील युवक आशिष जाधव, अनिकेत , आदर्श , तेजस , कुणाल , अमित , अविनाश लिंगायत , शुभम गेल्ये , तुषार गेल्ये , सागर गेल्ये , अनिकेत सुर्वे , ज्ञानदेव चौगुले , सचिन शिंदे , सागर शिंदे , तेजस पाचकळे , अजित राणे हे तरुण एकत्र आले आणि त्यांनी विविध प्रकारच्या भाज्यांची लागवड करण्याचे ठरविले . यामध्ये मिरची , भेंडी , गवार , वांगी , वालय , पडवळ , भोपळा , काकडी , दोडका आदि भाज्यांची आधुनिक पध्दतीने लागवड केली आहे. त्याचबरोबर विविध प्रकारच्या फुलझाडांचीही त्यांनी लागवड केली आहे.

भाज्यांची लागवड करण्यासाठी निधी जमवण्याचे आव्हान तरुणांसमोर मोठे आव्हान होते. यासाठी त्यांना शिवने येथील मिताली पवार आणि मनिष पवार यांनी आर्थिक मदत केली. आपली सर्व शेतजमीनही त्यांनी लागवडीसाठी दिली आहे. भाज्यांची लागवड कशी करायची यासाठी कोकण कृषी विद्यापीठाच्या डॉ . चंद्रकांत पवार यांनी या तरुणांना मार्गदर्शन केले. सुमारे 32 गुंठ्यामध्ये सेंद्रिय पध्दतीने ही भाजी लागवड करण्यात आली आहे. त्यामुळे लॉकडाउनमुळे मिळालेला वेळ तरुणांनी चांगल्या कामासाठी वापरत आधुनिक शेतीचा आदर्श ठेवला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या