तणावग्रस्त तरुणाची मनमाड-काचीगुडा रेल्वेखाली आत्महत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नसल्याने नैराश्येच्या गर्तेत सापडलेल्या १९ वर्षीय तरुणाने आज गुरुवारी सकाळी रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना संग्रामनगर उड्डाणपुलाजवळ घडली. हा तरुण शुक्रवारी नागपुरात होणाऱ्या कंदुरीच्या कार्यक्रमासाठी जाण्याच्या बहाण्याने घराबाहेर पडला होता. दोन तासानंतर त्याने मनमाड-काचीगुडा रेल्वेसमोर उडी मारल्याचे उघड झाले.

बीड बायपास रोडवरील संत ज्ञानेश्वरनगरात राहणारा सूरज गंगाधर भंडारे (१९) याचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे. त्याने इंग्लिश स्पिकींग आणि संगणकाचे प्रशिक्षण घेतले असून, तो नोकरीच्या शोधात होता. दोन-तीन दिवसांपूर्वी कंदुरीचा कार्यक्रम असल्याचे सांगून तो मित्र गणेश शिंदे व राहुल याच्यासोबत नागपूरला गेला होता. यावेळी त्याच्यासोबत शैक्षणिक कागदपत्रेदेखील होती. नागपूरहून तो मित्रांसोबत नोकरीच्या शोधात हैदराबादला जाणार होता. दरम्यान, आज सकाळी तो बायपास रोडवरील रेणुकामाता मंदिराजवळ वाहनातून उतरला. तेथून तो पायी संग्रामनगर उड्डाणपुलाखाली गेला. सूरज हा एकुलता एक असून, त्याची बहीण ज्ञानेश्वरनगरात राहते. तो कधी मामा, आई नाही तर बहिणीकडे रहायचा.

नागपूरला जाण्यापूर्वी त्याने त्याच्या मित्रांचा मोबाईल क्रमांक आईला दिला नव्हता. बुधवारी दुपारी त्याचे आईशी बोलणे झाले होते. त्यानंतर रात्री आईने त्याच्या मोबाईलवर संपर्क साधला होता, पण त्याचा मोबाईल लागत नव्हता. दरम्यान, त्याच्या आत्महत्येचे नेमके कारण समजू शकलेले नाही. सूरज भंडारे याने २१ एप्रिल रोजी मित्रांसोबत आपला वाढदिवस साजरा केला होता. त्याच्या वडिलांचे २००९ मध्ये पुण्यात हृदयाविकाराने निधन झाल्यापासून तो कधी मामा सतीश माधवराव पिंगळे यांच्याकडे तर कधी आईसोबत वाळूजला रहायचा. या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्याचे दत्ता बोटके यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपासाला सुरुवात केली आहे.