उपवास आणि तरुणाई

360

थोडीशी थंडीची चाहूल… मस्त, भटकंती, खाण्याची रेलचेल… सध्याच्या या पार्श्वभूमीवर आजच्या तरुणाईला मार्गशीर्षाचेही वेध लागतात. बहुसंख्य तरुणाई दर गुरुवारचे उपास करते, सामीष आहार बंद करते… काय आहेत आजच्या तरुणाईची उपवासाबाबत मतमतांतरे…

त्यामागचे शास्त्र जाणून घ्या

कोणतीही कृती करताना श्रद्धा असावी, पण अंधश्रद्धा असू नये. उपवास केल्याने देव प्रसन्न होतोच असं नाही. सकाळी लवकर उठणे, व्यायाम करणे, वेळेवर जेवणे, अभ्यास करणे आणि अभ्यासाकडे लक्ष देणे या गोष्टी पाळल्या तर उपवासाची गरजच भासणार नाही. खरं तर उपवासामागील शास्त्र तपासण्यापेक्षा त्यामागील शास्त्रीय कारण तपासणं जास्त महत्त्वाचं असतं. आपल्या संस्कृतीतील व्रतकैकल्यांमागे वैज्ञानिक कारणं आहेत. त्याकडे डोळेझाक करून आपण त्या परंपरा जशाच्या तशा स्वीकारतो. काहीजण उपवासाला फराळ एकढा खातात की पचनसंस्थेला दुप्पट जोमाने काम करावं लागतं. मग काय फायदा अशा उपवासाचा? –  निनाद कदम, रामनिरंजन आनंदीलाल पोदार महाविद्यालय, माटुंगा

उपवासाच्या निमित्ताने डाएटची हौस भागकणे

संकष्टी, गोपाळकाला, गणपती उत्सवात किंवा महाशिवरात्रीला आमच्या घरी वडीलधार्‍या माणसांकडून कुटुंबातील लहान मुलांकडून उपवास करून घेतले जायचे. तेव्हा उपवास नेमका कशासाठी करावा हा यक्षप्रश्न असायचा. जसजसा स्कतःचा दृष्टिकोन घडत गेला तसतसं यामागील वैज्ञानिक उत्तरं जाणून घेण्याची ओढसुद्धा निर्माण झाली. वैयक्तिकरित्या मला उपवास करणं खरंच गरजेचं वाटतं नाही. हल्ली डायटिंग करण्याची क्रेझच आहे. त्यात डायटिंग क्रेझला उपवासाशी जोडण्याची नवी परंपरा रूढ झाली आहे! उपवासाच्या निमित्ताने डाएटची हौस भागवली जातेय. तरुणींप्रमाणेच आजकाल तरुण मुलेही उपवास करतात. यामागेही इच्छित गोष्टी साध्य व्हाव्यात हाही हेतू असतो. पण अनवाणी चालणे, व्रतवैकल्ये या गोष्टी खरा भक्तिभाव असेल तरच कराव्यात. माझ्या मते कोणत्याही गोष्टीचा वैज्ञानिक दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. त्यामुळे आरोग्याच्या समतोलाच्या व्यतिरिक्त अन्य कोणताही वेगळा दृष्टिकोन उपवासाशी निगडित नसल्याने माझ्याकरता उपवास करणे महत्त्वाचे नाही किंवा उपवास करावा की करू नये हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. – स्नेहल जंगम, साठ्ये कॉलेज

मनापासूनच करावा

मी आजवर कधीच उपवास केला नाही. कारण उपवास अर्थात उपाशी राहणे किंवा मोजकं खाणे हेच माहिती असूनही त्यामागचा खरा उद्देश कधी कळला नाही. देवाविषयीची श्रद्धा म्हणून अनवाणी चालणे, उपवास करणारे अनेक मित्र-मैत्रिणी दिसतात. काहींना याची फक्त आवड असते. काहीजण मनाजोगे गुण मिळावेत याकरिता उपवास करतात. कोणतीही धार्मिक कृती करण्यापूर्वी त्यामागील शास्त्र जाणून घ्यायला हवे. मन शांत होऊन एकाग्रता साध्य होते. ही उपासना घरी बसूनही करता यईल. काहीवेळा उपवास हा श्रद्धा, शिस्त, भीती, किंवा परंपरा म्हणून होतो. ते मला पटत नाही. उपवास हा आरोग्य व त्याग भावनेपोटी करावा. याच भावनेनी मी उपवास करेन. पण उपवास करावा की नाही, तो चांगला की वाईट हे मला माहीत. हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. –  अनुष्का मोरे, पोद्दार कॉलेज

आरोग्य बिघडायला नको

काहीजणांच्या मते देवाला नवस बोलल्यावर चांगले मार्क्स मिळतील. पण अभ्यासच केला नसेल तर मार्क्स कुठून मिळणार! त्यामुळे अभ्यासावर लक्ष केद्रिंत करणं गरजेचे आहे. काहींना उपवासाची सवय नसली तरीही ते उपवास करतात. यातून अशक्तपणा, चक्कर येणे घडते. व्रतवैकल्ये करण्यास  हरकत नाही, पण आपल्या शरीराला न झेपणार्‍या गोष्टी करून देव प्रसन्न होतो असंही नाही. उपवास करताना आपल्या शरीराला कोणत्याही प्रकारची हानी पोहोचणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. माझ्यासारख्या कॉलेजला जाणार्‍या विद्यार्थ्यांनी खाण्या-पिण्याकर नियंत्रण ठेवणे व आपले आरोग्य सांभाळणे खूप गरजेचं आहे. –   सिद्धेश चौबळ, ए. पी. शहा इन्स्टिट्यूट, ठाणे

आपली प्रतिक्रिया द्या