
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो म्हणजेच पीआयबीचे युट्यूब चॅनेल ब्लॉक करण्यात आले आहे. असं का झालं याचं स्पष्टीकरण मिळालं नसलं तरी १६ जूनपासून हे चॅनेल बंद झाल्याचं खात्रीलायक वृत्त आहे. हे चॅनेल बंद झाल्याने मोदी सरकारने ४ वर्षात काय केलं हे सांगण्यासाठी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्या पत्रकार परिषदेचे थेट प्रक्षेपण होऊ शकले नाही.
सरकार आणि पत्रकार यांना जोडण्याचं काम पीआयबी करीत असते. मोदी सरकारने डिजिटल इंडीयाची घोषणा केल्यापासून या विभागाने मंत्र्यांच्या सगळ्या पत्रकार परिषदा महत्वाचे व्हिडीओ पत्रकार आणि लोकांना दिसावेत, कळावेत म्हणून युट्यूब चॅनेल सुरू केलं होतं. या चॅनेलचे जवळपास १.५ लाख सबस्क्रायबर आहेत. ज्यांच्यापर्यंत पोहोचणं आता या विभागाला अडचणीचं ठरतंय. युट्यूबच्या हिंदुस्थानातील कार्यालयाच्या ही बाब निदर्शनास आणून दिली असून हे चॅनेल पुन्हा पुर्ववत होईल असा विश्वास या विभागातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

























































