
मणिपूरमधून 356 दिवसांनंतर राष्ट्रपती राजवट हटवण्यात आली असून राज्यात पुन्हा एकदा सरकार स्थापन झाले आहे. भाजपचे विधिमंडळ पक्ष नेते युमनाम खेमचंद सिंह राज्याचे 13 वे मुख्यमंत्री बनले आहेत. युमनाम यांना राज्यपाल अजयकुमार भल्ला यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मैतेई समुदायाचे प्रतिनिधित्व करणारे खेमचंद हे माजी मुख्यमंत्री बिरेन सिंग यांचे जवळचे मानले जातात.
नागा समुदायाचे असलेले आमदार लोधी दिखो यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली असून ते नागा पीपल्स फ्रंटचे सदस्य आहेत. कुकी समुदायाच्या सदस्या नेमचा किपगेन यांनीही उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांनी दिल्लीतील मणिपूर भवन येथून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे शपथ घेतली. त्या मणिपूरच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या आहेत.
मणिपूरमधील मैतेई आणि कुकी समुदायांमधील वांशिक हिंसाचारामुळे तत्कालीन मुख्यमंत्री एन. बिरेन सिंग यांनी ९ फेब्रुवारी २०२५ रोजी राजीनामा दिला होता. त्यानंतर १३ फेब्रुवारीपासून राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज ३५६ दिवसांनंतर मणिपूरमधील राष्ट्रपती राजवट हटवली.


























































