अंधेरीत आजपासून युवा खेळाडूंची ‘दे टक्कर, ’आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

क्रीडा प्रतिनिधी । मुंबई

शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या ‘युवा खेळ समिट’च्या पहिल्या पर्वाला दणदणीत प्रतिसाद लाभल्यानंतर आता उद्यापासून या आंतरमहाविद्यालयीन क्रीडा महोत्सवाच्या दुसऱया पर्वाला सुरुवात होत आहे. अंधेरीतील शहाजीराजे क्रीडा संकुलात पुढील दोन दिवस या मानाच्या क्रीडा महोत्सवाचा थरार रंगणार असून उद्या आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. त्यानंतर 350हून अधिक महाविद्यालयांतील सहा हजारांपेक्षा अधिक युवा खेळाडू 15 खेळांच्या शर्यतीत ‘दे टक्कर’ करीत एकमेकांना भिडताना दिसतील.

आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेच्या वतीने युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ‘युवा खेळ समिट’च्या दुसऱया पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. या क्रीडा महोत्सवात मुंबईसह नवी मुंबई, ठाणे (शहर व ग्रामीण), पालघर, कल्याण/डोंबिवली, रायगड, पनवेल या विभागांतील महाविद्यालयांचा समावेश असणार आहे. या क्रीडा महोत्सवातील मुलींचा सहभाग आकर्षणाचे केंद्रबिंदू असेल. उद्घाटन सोहळ्याला क्रीडा, राजकीय, मनोरंजन क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती असणार आहे.

या खेळांच्या शर्यतींचा थरार रंगणार

बॉक्स क्रिकेट, रिंक फुटबॉल, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, कबड्डी, टेबल टेनिस, बॅडमिंटन, कॅरम, बॉक्ंिसग, बॉडीबिल्डिंग, जलतरण, बुद्धिबळ, स्क्वॉश, टग ऑफ वॉर, पब-जी.

मॅटवरील कबड्डी अन् डिजिटल खेळाचा समावेश

या वर्षी होणाऱया ‘युवा खेळ समिट’मध्ये पहिल्यांदाच कबड्डीचा थरार मॅटवर पाहायला मिळणार आहे. तसेच जनरेशन नेक्स्टचा खेळ म्हणून ओळखला जाणारा पब-जी या खेळाचाही यामध्ये समावेश करण्यात आला आहे.

क्रीडाप्रेमींचीही झुंबड उडणार

मुंबईतीलच नव्हे तर देशातील सर्वात मोठा आंतर महाविद्यालयीन क्रीडा महोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱया या समिटमधील लढतींची रंगत क्रीडाप्रेमींना विनामूल्य पाहता येणार आहे. त्यामुळे युवा खेळाडूंना आणखी चांगली कामगिरी करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. तसेच पुढील दोन दिवस अंधेरीत क्रीडाप्रेमींची झुंबड उडेल यात शंका नाही.