खेळ समिटमुळे ऑलिम्पिक पदकांचे स्वप्न पूर्ण होणार, आदित्य ठाकरे यांचा विश्वास

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना क्रीडा प्रतिनिधी । मुंबई 

अंधेरीतील शहाजीराजे क्रीडा संकुलात ‘युवा खेळ समिट’च्या दुसऱ्या पर्वाला मंगळवारी दिमाखात सुरुवात झाली. शिवसेना नेते-युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आंतर महाविद्यालयीन क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. ‘युवा खेळ समिट’सारख्या क्रीडा चळवळीतून सर्वांनी एकत्र यायला हवे. हिंदुस्थानचे ऑलिम्पिक पदकांचे स्वप्न यामुळे पूर्ण होईल, असा विश्वास यावेळी आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला. क्रीडा महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी महाविद्यालयांतील युवकांचा तुफान प्रतिसाद लाभला. मिनी ऑलिम्पिक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या क्रीडा महोत्सवात 350 महाविद्यालयांतील 6500 युवकांचा विक्रमी प्रतिसाद लाभला.

‘युवा खेळ समिट’च्या पहिल्या पर्वाला दणदणीत प्रतिसाद लाभला. इनडोअर आणि आऊटडोअर अशा दोन्ही खेळांमध्ये युवकांनी हिरिरीने सहभाग घेतला. आजपासून सुरू झालेल्या दुसऱ्या पर्वातही खेळाडूंचा सळसळता उत्साह दिसून येत आहे, असे आदित्य ठाकरे पुढे म्हणाले. या क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी उपमहापौर हेमांगी वरळीकर, शिवसेना सचिव सूरज चव्हाण, आमदार डॉ. मनीषा कायंदे, युवासेना सरचिटणीस अमोल कीर्तिकर, विभागप्रमुख व नगरसेवक रमेश कोरगावकर, नगरसेविका तेजस्विनी घोसाळकर, माजी स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांच्यासह शिवसेना आणि युवासेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती. युवासेनेच्या वतीने या क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

इतर खेळांमध्येही हिंदुस्थान झेप घेतोय
हिंदुस्थान आता क्रिकेटच नव्हे तर इतर खेळांमध्येही झेप घेऊ लागलाय. हिंदुस्थानात 17 वर्षांखालील फुटबॉल वर्ल्ड कपचे यशस्वी आयोजन करण्यात आले. बॅडमिंटन, नेमबाजी, टेनिस, कुस्ती यांसारख्या इतर खेळांमधूनही राष्ट्रीय हीरो तयार झालेत. आपल्याकडे क्रीडा संस्कृती आहे. फक्त सरकारकडून आणखी सहकार्य व्हायला हवे, असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्टपणे सांगितले.

क्रीडापटूंची झुंबड
अंधेरीतील शहाजीराजे क्रीडा संकुलात ‘युवा खेळ समिट’ला सुरुवात झाली. यावेळी सकाळी
7 वाजल्यापासूनच युवा खेळाडूंची रेलचेल येथे दिसून आली. प्रत्येक खेळांतील सहभागासाठीच्या नोंदणीसाठी झुंबड उडाली होती. रजिस्ट्रेशन ‘ओव्हर फ्लो’ झाले होते.

खेळाडूंसाठी अत्याधुनिक सोयीसुविधा
महाविद्यालयांतील खेळाडूंना या क्रीडा महोत्सवात अत्याधुनिक सोयीसुविधा देण्यात आल्या. कबड्डी मॅटवर खेळवण्यात आली. पब जीसाठी स्पेशल रूम होती. स्वीमिंगसाठी अव्वल दर्जाचे स्टेडियम तयार करण्यात आले. रिंक फुटबॉलसाठी स्पेशल जागा करण्यात आली होती. प्रत्येक खेळासाठी मेहनत घेण्यात आली होती. तसेच खेळाडूंच्या जेवणाचीही उत्तम व्यवस्था करण्यात आली हे विशेष. जवाहर महाविद्यालय, मोखाडा आणि एस. के. सोमय्या महाविद्यालय यांच्यामधील चुरशीच्या कबड्डी लढतीने क्रीडा रसिकांच्या डोळ्याचे पारणे फेडले.