
सामना प्रतिनिधी । कोल्हापूर
‘जागरूकता, प्रसंगावधान आणि कृती’ या त्रिसूत्रीचा वापर करून स्वरक्षणासाठी प्रसंगी दुर्गा बना असा संदेश शिवसेना नेते, युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज विद्यार्थिनींना दिला. आदित्य ठाकरे यांनी आपल्या ‘संवादयात्रे’त कोल्हापूरच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकांसह स्वसंरक्षणाचे धडे दिले. खेडय़ातल्या विद्यार्थिनी अत्यंत तरबेज आणि जिगरबाज असतात, परंतु त्यांनी स्वसंरक्षणासाठी कोणाच्याही मदतीशिवाय स्वतः पुढे आले पाहिजे असे ते म्हणाले.
आदित्य ठाकरे यांच्या संवादयात्रेचा आज दुसरा दिवस होता. शाहूवाडी तालुक्यातील सरुडसारख्या दुर्गम भागांतून संवादयात्रेची पुढची वाटचाल सुरू झाली. शाहूवाडी तालुक्यातील ग्रामीण शाळा आणि हातकणंगले येथील संजय घोडावत उच्च शिक्षण संकुलातील विद्यार्थी-विद्यार्थिनींशी संवाद साधताना आदित्य ठाकरे यांनी शालेय अभ्यासक्रम, बेरोजगारी आदीबाबत विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली. तेथील शिवशाहू महाविद्यालय आणि इंदिरा गांधी हायस्कूलच्या पटांगणावर आयोजित कार्यक्रमात त्यांनी शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थी-विद्यार्थिनींना त्यांनी व्यासपीठावर बोलावले आणि मेहूल वोरा यांच्या नेतृत्वाखाली प्रशिक्षकांमार्फत आत्मसंरक्षणाचे मूलभूत धडे दिले.
अत्याचाराचा प्रसंग आलाच तर समोरच्या व्यक्तीच्या नाक, तोंड तसेच समोर दिसेल तिथे मारा आणि पळा, पण घाबरू नका. प्रतिकार करा आणि इतरांना मदतीसाठी हाक मारा. मग तुम्हाला छेडण्याची हिंमत कोणामध्ये होणार नाही असा आत्मविश्वासही आदित्य ठाकरे यांनी विद्यार्थिनींमध्ये जागविला. प्रत्येकाला रोजगाराभिमुख शिक्षण मिळण्याची गरज यावेळी आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली.
घाबरू नका, ही तर माझी जादू!
आदित्य ठाकरे हे स्वरक्षणाचे कसब दाखवत असताना जोरदार वाऱ्याने सभामंडप काहीसा उंच उडाला. तेव्हा प्रसंगावधान राखत आदित्य ठाकरे म्हणाले, ‘घाबरू नका, ही तर माझी जादू आहे, आपलीच हवा आहे.’ यावर सभामंडपात एकच हशा पिकला आणि वातावरण पुन्हा हलकेफुलके झाले. त्यांच्या या हजरजबाबीपणाला उपस्थितांनीही प्रचंड दाद दिली.
आता पुढील प्रश्न युतीवर आहे काय?
मराठा आरक्षण जाहीर झाले, पण दाखले कुठे मिळतात, यासंदर्भात आलेला प्रश्न मुख्यमंत्र्यांनाच विचारावा लागेल. योजना सुरू होतात त्या राबविल्या पाहिजेत असे सांगताना आता पुढील प्रश्न ‘युती संदर्भात आहे काय’, असा प्रतिप्रश्न आदित्य ठाकरे यांनी करताच विद्यार्थ्यांसह सर्वांच्याच चेहऱ्य़ावर हस्य फुलले. ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांमध्येही ज्वलंत प्रश्न उपस्थित होत असल्याने त्याची दादही आदित्य ठाकरे यांनी दिली.





























































