‘महाराष्ट्र ई-ग्रंथालय’ सुरू करण्याची युवा सेनेची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

माहिती-प्रसारण क्षेत्राच्या कक्षा रुंदावत असून त्या दृष्टीने राज्यातील विद्यार्थ्यांना जगभरातील माहितीचा स्रोत उपलब्ध करण्यासाठी ‘महाराष्ट्र ई-ग्रंथालय’ सुरू करा, अशी मागणी युवा सेनेने उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.

‘ई-ग्रंथालया’द्वारे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक पुस्तके, शैक्षणिक अभ्यासक्रमाचे निरनिराळे स्रोत, अत्याधुनिक व नवीनतम तंत्रज्ञानाची माहिती असलेले दस्तावेज,  ई-पुस्तके, ई-जर्नल्स, विज्ञानविषयक जर्नल्स तातडीने उपलब्ध होतील तसेच राज्यातील ऐतिहासिक, सांस्पृतिक, सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक पैलू ‘ई-ग्रंथालय’ संकल्पनेमुळे संपूर्ण जगभरात पोहचावेत यासाठी युवा सेना शिष्टमंडळाने राज्याचे मंत्री, शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी ‘महाराष्ट्र ई-ग्रंथालय’ संकल्पना ‘वेब पोर्टल’ आणि ‘मोबाईल अॅप’च्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावे अशी मागणी उदय सामंत यांच्याकडे केली आहे.

सदर मागणीचे निवेदन उदय सामंत यांना देतेवेळी युवा सेना युवती सचिव दुर्गा भोसले-शिंदे , युवासेना कोषाध्यक्ष आणि नगरसेवक अमेय घोले, युवासेना कार्यकारिणी सदस्य साईनाथ दुर्गे, मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य प्रदीप सावंत आणि शशिकांत झोरे आदी उपस्थित होते.