विद्यापीठाचा पदवीदान सोहळा नोव्हेंबर अखेरपर्यंत घ्या! युवासेनेने केली कुलगुरूंकडे मागणी

या वर्षी मुंबई विद्यापीठाचे निकाल वेळेत लागले असून अनेक विद्यार्थ्यांना लवकरात लवकर परदेशी शिक्षणासाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठाने लवकरात लवकर पदवीदान सोहळा घ्यावा, अशी मागणी युवासेनेने कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांच्याकडे केली आहे.

मुंबई विद्यापीठाने विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना विद्यापीठाची कागदपत्रे आणि प्रमाणपत्र ‘एबीसी – आयडी’ प्रणाली तयार केल्याशिवाय देता येत नाही. सर्व महाविद्यालयांनी याकरिता विद्यार्थ्यांची आवश्यक माहिती विहित नमुन्यात विद्यापीठाला देणे गरजेचे आहे; परंतु महाविद्यालयांनी पूर्तता न केल्याने अनेक विद्यार्थ्यांना गुणपत्रिका वितरीत करण्यात आल्या नाहीत. तरी विद्यापीठाने विशेष प्रयत्न करून विद्यार्थ्यांचे ‘एबीसी-आयडी’ तातडीने करण्याची मागणी युवासेनेकडून करण्यात आली. याबाबत शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार युवासेना सिनेट सदस्य शीतल शेठ-देवरुखकर, प्रदीप सावंत, मिलिंद साटम आणि माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर यांनी कुलसचिव डॉ. प्रसाद कारंडे यांची भेट घेऊन निवेदन दिले.