परीक्षेतील गैरप्रकारात दोषी प्राध्यापकांना तत्काळ निलंबित करा, युवासेनेचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, लातूर

एम.एस. बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालयातील परिक्षेच्या गैरप्रकाराबाबत दोषी ठरवण्यात आलेल्या तिन्ही प्राध्यापकांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अन्यथा महाविद्यालयात जाऊन त्यांच्या तोंडाला काळे फासण्यात येईल, असा इशारा युवासेनेच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

महात्मा बसवेश्वर शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष, सचिव यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की, संस्थेअंतर्गत चालणाऱ्या एम.एस. बिडवे अभियांत्रिकी महाविद्यालयातील तीन प्राध्यापकांना परिक्षेच्या कामात गैरप्रकार केल्याबद्दल विद्यापीठाने दोषी ठरवले व त्यांच्यावर प्रतिबंध लावण्यात आला. अशा लोकांमुळे महाविद्यालयाची व पर्यायाने शिक्षण संस्थेचीही बदनामी झाली. त्यामुळे या दोषी प्राध्यापकांना तात्काळ निलंबित करावे आणि समाजासमोर एक चांगला पायंडा उभा करावा. जर आठ दिवसात निलंबित करण्यात आले नाही तर युवासेनेच्या वतीने महाविद्यालयात जाऊन संबंधिताच्या तोंडाला काळे फासण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. निवेदन देताना युवासेनेचे जिल्हा युवा अधिकारी अ‍ॅड. श्रीनिवास मातोळकर, कुलदीप सूर्यवंशी, संतोष माने, आकाश मसाने, सौरभ बुरबुरे यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.