
सामना प्रतिनिधी । मुंबई
जंगलात शहरं उभारण्यापेक्षा सिमेंट-काँक्रीटच्या जंगलात हिरवळ उभी करणं मानवतेसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, सिमेंटच्या टॉवरपेक्षा झाडांचे टॉवर उभे करा, असे प्रतिपादन शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केले. बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने उभारलेल्या वृक्ष संवर्धन प्रकल्पाला आदित्य ठाकरे यांनी भेट दिली. या प्रकल्पात भव्य नर्सरी उभारण्यात आली असून त्याबद्दल त्यांनी जाणून घेतले.
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने 2008 पासून राष्ट्रीय उद्यानात वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. एका वर्षाला 18 ते 20 हजार रोपांची नर्सरी तयार करण्याचे प्रतिष्ठानचे उद्दिष्ट आहे. विशेष म्हणजे ही रोपे बियाण्यांपासून तयार केली जातात. चिमण्या-पाखरांनी झाडांची फळे खावीत आणि जैवविविधता टिकून राहावी यासाठी फळझाडांच्या संवर्धनाचेही कार्य प्रतिष्ठानच्या माध्यमातून हाती घेण्यात आल्याची माहिती प्रतिष्ठानचे सदस्य डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांनी दिली. यावेळी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले, युवासेना कार्यकारिणी सदस्य सिद्धेश कदम, रूपेश कदम, अंकित प्रभू आणि स्थानिक आमदार रमेश लटके उपस्थित होते. दरम्यान, वसंत लॉनतर्फे अंधेरी-मरोळ या ठिकाणी माजी नगरसेवक कमलेश राय यांच्या पुढाकाराने तब्बल 1100 रोपांची लागवड करण्यात येणार आहे. त्याचा शुभारंभ आदित्य ठाकरे यांच्याहस्ते करण्यात आला.
पर्यावरण जपले नाही तर माणूसही शिल्लक राहणार नाही
प्रतिष्ठानच्या सदस्यांनी उद्यानातील एका डोंगरावरून गर्द झाडांची जागा दाखवली. पूर्वी या ठिकाणी सिमेंटचे टॉवर आणि रस्ता दिसायचा, परंतु आता डोंगरावरून पाहिल्यास उंचच्या उंच गर्द झाडी दिसते. ते पाहून आदित्य ठाकरे म्हणाले आज जर आपण पर्यावरणाचे संवर्धन केले नाही तर आपणच निर्माण केलेले तंत्रज्ञान मागे पडेल आणि एकही माणूस शिल्लक राहाणार नाही.
संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, गांडुळखत प्रकल्प, पाणी अडवा पाणी जिरवा असे प्रकल्प राबवण्यात येणार आहेत.

























































