सामना प्रतिनिधी । मुंबई
यवतमाळ येथे बुधवारी रात्री काही कश्मिरी विद्यार्थ्यांना झालेली मारहाण ही पाकिस्तान आणि दहशतवादविरोधी उद्रेकातून घडली असली तरी ती चुकीची आणि निषेधार्थ आहे. देशप्रेमी कश्मिरी तरुणांच्या पाठीशी युवासेना कायम उभी राहील, अशी ठाम भूमिका युवासेनेने मांडली आहे.
कश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशात आणि युवा वर्गात आक्रोशाचे वातावरण आहे. पाकिस्तानविरोधी कारवाई करावी, अशी सर्व देशवासीयांची तीव्र भावना आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे देशप्रेमी होतेच पण त्यांच्या आदेशानुसार, महाराष्ट्राच्या महाविद्यालयांमध्ये कश्मीरातील तरुणांच्या शिक्षणाकरिता ‘कोटा’ करण्यात आला. त्यामुळे आज हजारो कश्मिरी तरुण हे मुंबईसह उर्वरित महाराष्ट्रात सुखरूपरीत्या शिक्षण घेत आहेत आणि त्यांचे करीअर घडवत आहेत. यवतमाळ येथे घडलेल्या घटनेत जर युवासेनेचे कार्यकर्ते असतील तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेही युवासेना मध्यवर्ती कार्यालयातून पाठवलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.























































